बारामती येथे प्रथमच महिलांसाठी ‘बारामती हिरकणी रन २०२६’ चे आयोजन

0
6

बारामती येथे प्रथमच महिलांसाठी ‘बारामती हिरकणी रन २०२६’ चे आयोजन

बारामती, दि. २७ (संतोष शिंदे)

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामती शहरात प्रथमच केवळ महिलांसाठी ‘बारामती हिरकणी रन २०२६’ या भव्य धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचे आरोग्य, सामर्थ्य व सक्षमीकरण या प्रमुख उद्देशाने आयोजित ही स्पर्धा रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजता तिरंगा सर्कल (तीन हत्ती चौक) ते पेन्सिल चौक या मार्गावर होणार आहे.
या स्पर्धेच्या आयोजनाबाबतची सविस्तर माहिती मंगळवार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथील हॉटेल कृष्णसागर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. सदर पत्रकार परिषदेत प्रशांत (नाना) सातव यांनी प्रमुख माहिती दिली.
यावेळी कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशन, बारामती हेल्थ क्लब व बारामती रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बारामतीचे माजी नगराध्यक्ष ह. भ. प. धोंडीबा आबाजी सातव यांच्या नावाने गेली १६ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, कला व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात तालुका पातळीवर फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस डॉ. दिलीप लोंढे, डॉ. वरद देवकाते, ॲड. स्नेहा पवार, ॲड. नेहा भापकर, वैशाली पिल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत संपूर्ण भारतातील १५ वर्षांवरील मुली व महिलांना सहभागाची संधी देण्यात आली असून, ५ व १० किलोमीटर अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धा १५–२५, २६–३५, ३६–४५, ४६–५५, ५६ वर्षांवरील व ओपन अशा सहा वयोगटांत विभागण्यात आली आहे. ५ किमी रनसाठी ५५५ रुपये, तर १० किमी रनसाठी ९९९ रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे.
या स्पर्धेत अंदाजे २५०० ते ३००० महिलांचा सहभाग अपेक्षित असून, प्रत्येक स्पर्धकास ब्रॅण्डेड टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र, नाष्टा, एनर्जी ड्रिंक, फ्रुट बास्केट व वैद्यकीय सुविधा दिली जाणार आहे. प्रत्येक वयोगटातून विजेती व उपविजेती निवडण्यात येणार असून, त्यांना ट्रॉफी, आकर्षक मेडल, प्रमाणपत्र व रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व वयोगट मिळून ३ लाख ३ हजार ८८७ रुपयांची भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
बारामतीबाहेरून येणाऱ्या १०० महिलांसाठी प्रत्येकी ५०० रुपयांत निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सहभागी महिलांना सिद्धेश्वर मंदिर, बाबूजी नाईक वाडा, जिल्हा क्रीडा संकुल, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मेडिकल कॉलेज, सनसेट पॉईंट, तिरंगा सर्कल, क्लॉक टॉवर व प्रशासकीय भवन आदी ठिकाणांचे मोफत बारामती दर्शन घडविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे थेट प्रक्षेपण KPL YouTube Channel वरून करण्यात येणार असून, स्पर्धेसाठी नोंदणी दि. २६ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली आहे. इच्छुक महिलांनी www.baramatihirkani.com किंवा Konfhub Platform वरून दि. १ मार्च २०२६ पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे व व्यायामाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने स्पर्धेपूर्वी दर रविवारी सकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत तिरंगा सर्कल (तीन हत्ती चौक) येथे तज्ञ प्रशिक्षकांकडून मोफत प्रशिक्षण व आहार मार्गदर्शन दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here