
कृषिक प्रदर्शनात रविवारी सुट्टीच्या दिवशी तुडुंब गर्दी …
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या आज रविवार दि. १९ जानेवारी रोजी कृषिक प्रदर्शनाच्या ४ दिवशी सुट्टीच्या निमित्ताने राज्याच्या प्रत्येक भागातून शेतकर्यांनी सहभाग नोंदवला.

आज सकाळी आठ वाजल्यापासूनच राज्यभरातून आलेल्या शेतकर्यांनी गर्दी केली होती. शेतीसाठी आवश्यक असलेली यंत्र सामुग्री, अवजारे पाहण्यास शेतकर्यांनी गर्दी केली होती. यामध्ये फवारणी यंत्रे, आंतर मशागतीसाठी उपयुक्त यंत्रे, वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्म सिंचन प्रणालीची माहिती घेताना शेतकरी दिसले. तसेच रेशीम, मधुमक्षिका पालन, कमी खर्चातील शेडनेट मधील भाजीपाला तंत्रज्ञान पाहून शेतकरी हरखून गेले होते.
डॉ. अप्पासाहेब पवार कृषि तंत्रज्ञान दालनामध्ये असलेल्या विविध कंपन्यांच्या दालनामध्ये शेतकर्यांनी माहिती घेणेसाठी गर्दी केली होती. यामध्ये खताच्या, औषधांच्या, बियाण्यांच्या, संशोधन केंद्रांच्या, विद्यापीठाच्या स्टॉलवर माहिती घेताना शेतकरी दिसून आले. कृषी विभाग, आत्मा, पुणे, नाबार्ड यांच्या तर्फे शेतकरी कंपन्या, बचत गट यांच्या दालनामध्ये देखील शेतकरी उत्साहाने महिती घेत होते.
संस्थेचे विश्वस्त मा.श्री. रणजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज भीमथडी हॉर्स शो चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५१ भीमथडी जातीच्या घोड्यांचा सहभाग होता. रिले रेस, पोल बेंडिंग, नर आणि मादी या चार श्रेणींमधून विजेत्या १९ घोड्यांना डॉ. ए. सी. मेहता, संचालक, राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र, बिकानेर यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.
मादी घोड्यांमध्ये प्रथम क्रमांकासाठी श्री. दत्तात्रय निगुट, पारनेर यांना रु. २१,००० आणि प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकासाठी श्री. धनंजय खेडकर, शिरूर यांना रु. ११,००० आणि तृतीय क्रमांकासाठी श्री. विशाल आहेरराव, नाशिक यांना रु. ७,००० चे पारितोषिक देण्यात आले. नर घोड्यामध्ये प्रथम व तृतीय क्रमांकासाठी श्री. सनी जाधव, अहिल्यानगर यांच्या घोड्याला रु. २१,००० व रु. ७,००० चे आणि द्वितीय क्रमांकासाठी श्री. सिद्धार्थ वाणे, अहिल्यानगर यांच्या घोड्याला रु. ११,००० चे पारितोषिक देण्यात आले.
पोल बेंडिंग प्रकारामध्ये प्रथम क्रमांकासाठी श्री. आफताब नालबंद यांना रु. २१,०००, द्वितीय क्रमांकासाठी श्री. रणजीत लांबखडे यांना रु. ११,००० आणि तृतीय क्रमांकासाठी श्री. धनंजय खेडकर यांना रु ७,००० चे पारितोषिक देण्यात आले. रिले रेस प्रकारामध्ये श्री. धनंजय खेडकर, श्री. दत्तात्रय निगुट, श्री. अशोक आंबेडकर, श्री. अतुल खरमाडे यांना पारितोषिक देण्यात आले.
मा. खासदार संजय देशमुख, यवतमाळ तसेच माजी कृषी आयुक्त श्री. प्रभाकर देशमुख या मान्यवरांनी आज प्रदर्शनाला भेट दिली.
उद्या कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांच्यातर्फे करण्यात आले.