


पोलीस प्रशासन ॲक्शन
मोडवर…. ओव्हरलोड ट्रकवर बारामती पोलिसांची धडक कारवाई : १४ वाहने जप्त….!
बारामती | २८ जुलै २०२५
बारामती शहर व परिसरातील रस्त्यांवर धोकादायक वेगाने आणि क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन धावणाऱ्या ट्रक व हायवा वाहनांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, आणि वाहतूक निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली एकूण १४ ओव्हरलोड वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या सर्व वाहनांवर खटले दाखल करून त्यांची प्रकरणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती वाहतूक निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
ओव्हरलोडिंगमुळे रस्त्यांची चाळण, नागरिकांचे प्राण धोक्यात!
बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात मुरूम, खडी, वाळू आणि इतर बांधकाम साहित्याची वाहतूक ट्रकमार्फत होते. मात्र, अनेक वाहनांमध्ये क्षमतेच्या २ ते १० टनांपर्यंत अधिक माल भरला जातो. त्यामुळे रस्त्यांचे नुकसान, अपघातांची शक्यता, आणि नागरिकांचे प्राण संकटात सापडत आहेत.




पोलिसांनी घेतलेल्या या कारवाईमुळे वाहतूक शिस्त आणि सुरक्षिततेला चालना मिळण्याची आशा आहे. कारवाई दरम्यान जप्त केलेली सर्व वाहने सध्या बारामती वाहतूक शाखेच्या ताब्यात ठेवण्यात आली आहेत.
पोलीस प्रशासनाचा इशारा : “सातत्याने कारवाई होणार”
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक विलास नाळे, वाहतूक शाखेचे सुभाष काळे, प्रदीप काळे, माया निगडे, रूपाली जमदाडे, प्रज्योत चव्हाण, ओंकार सीताप, स्वाती काजळे, अजिंक्य कदम यांचा सहभाग होता. ही मोहीम पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
अधिकारी म्हणाले….?
“गेली अनेक महिन्यांपासून वाहतूक शाखा नियम रुजवण्यासाठी कार्यरत आहे. तरीही अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत.”
— गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक
“ओव्हरलोड वाहनांमुळे विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या जीविताला धोका निर्माण होतो. शिस्तबद्ध वाहतुकीसाठी ही मोहीम गरजेची आहे.”
— सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी
“ओव्हरलोडिंग हे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर इतरांच्या जिवाशी खेळ आहे. ही कारवाई केवळ नियमबद्धतेसाठी नव्हे, तर जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. पुढे मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जाईल.”
— चंद्रशेखर यादव, वाहतूक निरीक्षक
जनतेला आवाहन…
बारामती पोलिसांकडून सर्व वाहनचालक व वाहनमालकांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा अशा कठोर कारवायांची पुनरावृत्ती अटळ असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.