बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये रेशीम शेतकरी व रिलर्स मेळावा संपन्न

0
173

बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये रेशीम शेतकरी व रिलर्स मेळावा संपन्न

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ व प्रादेशिक व जिल्हा रेशीम कार्यालय, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने रेशीम कोष मार्केट, बारामती मध्ये सुरू केलेल्या ई-नाम पद्धतीने कोष लिलाव वर्षपुर्ती निमित्त रेशीम शेतकरी व रिलर्स मेळावा शुक्रवार दि. १३/१०/२०२३ रोजी बारामती बाजार समितीचे सभापती मा.सुनिल पवार यांचे अध्यक्षतेखाली आणि मा.डॉ. कविता देशपांडे, सहाय्यक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय, पुणे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


बारामती रेशीम कोष मार्केट मध्ये चांगली विक्री व्यवस्था तसेच इतर व बाहेरील राज्यातील मार्केट प्रमाणे दर मिळतील असे बाजार समिती तर्फे प्रयत्न सुरू आहेत. तसेच समिती तर्फे शेतकरी व रिलर्स यांना संबंधित सुविधा उपलब्ध करून देणेत येतील. बाजार समिती तर्फे रिलर्स यांना समितीचे लायसेन्स देणेत येईल. त्यामुळे सर्व रिलर्स यांनी लायसेन्स घेऊन ई-नाम प्रणाली मध्ये रजिस्टर व्हावे. ई-नाम पद्धती असल्याने देशातील रिलर्स व खरेदीदार यामध्ये भाग घेऊ शकतात. त्यामुळे रिलर्स यांना एकाच ठिकाणी कोष मिळतील व शेतक-यांना ही जादा रिलर्स सहभागी झाल्यास स्पर्धा होऊन कोषास चांगला दर मिळेल. त्याचा शेतक-यांना आर्थिक फायदा होऊन त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल. शेतक-यांनी आपले कोष ग्रेडींग करून आणावेत. त्यामुळे प्रतवारीनुसार कोषास योग्य दर मिळेल. शेतक-यांना कोषास चांगला दर मिळाल्यास शेतक-यांची संख्या वाढुन जादा कोष विक्रीस येतील. त्यामुळे शेतकरी व रिलर्स यांनी एकमेकांना सहकार्य केल्यास बारामती मार्केट हे भविष्यात मोठे कोष मार्केट होईल आणि शेतक-यांना जवळच हक्काचे मार्केट तयार होईल असे यावेळी सभापती श्री. सुनिल पवार मत व्यक्त केले.


यावेळी डॉ. कविता देशपांडे, सहाय्यक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय, पुणे यांनी रेशीम उत्पादक शेतक-यांना मार्गदर्शन केले. तसेच रेशीम विभागा मार्फत शासकीय योजनांची माहिती दिली. शेतक-यांना योग्य ते सहकार्य केले जाईल. शेतक-यांनी सिल्क सामुग्री व मनरेगा या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
बारामती मार्केट कमिटी व जिल्हा रेशीम विभागाने एकत्रिक रिलर्स यांची बैठक घेऊन रेशीम मार्केटच्या अडचणी व दरा बाबत तसेच आवक या विषयी चर्चा करणेत आली. राज्यातील सांगली, कराड, कोल्हापुर तसेच कर्नाटक, तेलंगणा, हैद्राबाद, तामिळनाडु येथील रिलर्स यांचे बरोबर संवाद साधुन यांच्या अडचणी व समस्या समजावुन घेतल्या व त्या सोडणेचा प्रयत्नशील राहु तसेच शेतकरी व रिलर्स यांना योग्य ती मदत करणेत येईल असे सांगितले.
पणन मंडळाचे एजीएम श्री. लोखंडे साहेब यांनी ई-नाम प्रणाली तसेच ई-नाम ऑनलाईन ऑक्शन, ई- पेमेंट इत्यादीची माहिती दिली. बारामती रेशीम कोष मार्केट हे ई-नाम प्रणाली द्वारे ऑनलाईन ऑक्शन करणारे देशातील हे पहिले मार्केट असल्याचे सांगितले. ई-नाम मध्ये कोष कमोडिटीचा समावेश करणेत आला आहे. ई-नाम मध्ये देशातील खरेदीदार सहभागी होत असल्याने कोषास चांगला दर मिळत आहे असे मत व्यक्त केले.
शेतक-यांनी कोष इतरत्र व बाहेरील खाजगी व्यापा-यांना विक्री करू नये. त्यामध्ये फसवणुक होऊ शकते. तसेच भविष्यातील धोके विचारात घेऊन रेशीम कोष उत्पादक शेतक-यांनी आपला कोष बारामती मार्केट मध्येच विक्रीस आणावा. तसेच खरेदीदार व रिलर्स यांनी ही परस्पर व थेट कोष खरेदी करू नये असे आवाहन बारामती मार्केट कमिटी तर्फे करणेत येत आहे. यावेळी रेशीम उत्पादक शेतक-यांना उझी माशीचे नियंत्रण या विषयी बारामती रेशीम विभाग शास्त्रज्ञ हुमायुन शरीफ यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी रेशीम तांत्रिक सेवा केंद्र धारवाडचे हुक्केरी साहेब, हुमायुन शरीफ, शास्त्रज्ञ, बाजार समितीचे उपसभापती निलेश लडकत, सदस्य बापुराव कोकरे, विनायक गावडे, सतिश जगताप, दयाराम महाडिक, रामचंद्र खलाटे, युवराज देवकाते, शुभम ठोंबरे तसेच जिल्हा रेशीम अधिकारी बापुराव कुलकर्णी सांगली, मुरलीधर कुट्टे अहमदनगर, पाडवी साहेब, सातारा तसेच समितीचे सचिव अरविंद जगताप व रेशीम उत्पादक शेतकरी व रिलर्स उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. संजय फुले यांनी केले. तर सुत्रसंचलन व आभार श्री. संदीप आगवणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here