
बारामतीत स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज स्तंभाचे होणार लोकार्पण
बारामती, ता. 28 – राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य प्रतिक असलेला बारामती शहरातील सर्वात उंच राष्ट्रध्वज स्तंभ येत्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) लोकार्पित केला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता तीन हत्ती चौकातील नटराज नाटय कला मंदीरासमोरील जागेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी ही माहिती दिली.
बारामती शहरात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) तीस मीटर उंचीचा (शंभर फूट उंच) राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा स्तंभ साकारण्यात आला आहे. बारामतीला स्वातंत्र्य चळवळीसह स्वातंत्र्य सैनिकांचा वैभवशाली वारसा आहे. या पार्श्वभूमीवर देशभक्ती अधिक जाज्वल्य व्हावी या उद्देशाने हा स्तंभ उभारण्यात आल्याचे किरण गुजर यांनी नमूद केले.
दरम्यान राष्ट्रध्वज स्तंभ लोकार्पण सोहळ्यानिमित्त देशभक्तीपर गीत व नृत्यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे, सोबतच फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार असून फायर शोचेही आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्व बारामतीकरांसाठी खुला आहे. तीन हत्ती चौक भिगवण चौकादरम्यानच्या दोन्ही रस्त्यांवर नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बारामतीच्या दृष्टीने हा ऐतिहासिक कार्यक्रम असून बारामतीकरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन किरण गुजर यांनी केले आहे.
वाहतूक व्यवस्थेत बदल…..
तीन हत्ती चौकात येण्यासाठी वसंतनगर, म.ए.सो. विद्यालय, क्लॉक टॉवर रस्ता, नीरा डावा कालवा रस्ता, श्री महावीर भवन रस्ता बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांनी भिगवण चौक मार्गेच कार्यक्रमस्थळी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डौलाने फडकणार राष्ट्रध्वज….
बारामती पंचक्रोशीमध्ये इतका उंच राष्ट्रध्वज स्तंभ नाही. प्रथमच हा स्तंभ साकारत असून या स्तंभावर भारतीय तिरंगा मोठया डौलाने फडकणार आहे. देशभक्तीची भावना या मुळे निश्चितपणे वाढीस लागणार आहे.