बारामतीत सिटी बससेवेची मागणी जोर धरू लागली…!

0
17

बारामतीत सिटी बससेवेची मागणी जोर धरू लागली

बारामती शहराचा वेगाने होणारा विस्तार, वाढती रहदारी आणि नागरिकांच्या वाहतूक समस्यांमुळे पुन्हा एकदा सिटी बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पूर्वी काही वर्षांपूर्वी शहरात सिटी बससेवा सुरू होती, मात्र ती काही कारणांमुळे बंद करण्यात आली होती. आता, खासगी वाहनांवर वाढती अवलंबित्वता, प्रवास खर्च आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर, ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिक व प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

वाहतूक समस्यांचा नागरिकांना सामना

बारामतीतील महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिक यांना सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायाअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खासगी रिक्षा आणि वाहने वापरणे अनेकांसाठी परवडत नाही, तसेच शहरात सतत वाढणाऱ्या वाहतुकीमुळे कोंडीची समस्या अधिकच तीव्र झाली आहे. पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी सिटी बससेवेची मागणी अधिक तीव्र केली आहे.

महत्वाचे मार्ग जिथे सिटी बससेवा आवश्यक

बारामती शहरातील काही प्रमुख भागांना जोडण्यासाठी सिटी बससेवा सुरू करण्याची गरज भासत आहे. खालील मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा असून, बससेवा सुरू झाल्यास अनेक नागरिकांना फायदा होईल:

  1. गुणवडी – मळद – फलटण रोड – खंडोबा नगर – कसबा – पाटस रोड – सातव चौक – तांदळवाडी चौक – भिगवन चौक – पेन्सिल चौक – विद्या प्रतिष्ठान चौक – जलोची – पिंपळे – बारामती बस स्टॉप
  2. बारामती बस स्टॉप – भिगवन चौक – पेन्सिल चौक – मेडिकल कॉलेज – महिला हॉस्पिटल – वीरशैव मंगल कार्यालय – रिंग रोड – कसबा विभाग
  3. मळद – भिगवन चौक – रुई – पाटी मार्गे सावळ – जलोची – पिंपळी – तांदुळवाडी – पेन्सिल चौक – कन्हेरी – काटेवाडी

या मार्गांवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापारी प्रवास करतात. तसेच, महिला व वयोवृद्धांसाठी सुरक्षित आणि परवडणाऱ्या बससेवेची नितांत गरज आहे.

प्रशासनाकडून त्वरित निर्णयाची अपेक्षा

बारामती शहरात सिटी बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. नागरिक, सामाजिक संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यास समर्थन दर्शवले आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली, तर लवकरच ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

सिटी बसेस सुरू झाल्यास, वाहतूक कोंडी कमी होईल, इंधनाची बचत होईल, प्रदूषण घटेल आणि नागरिकांना परवडणाऱ्या दरात प्रवासाची सुविधा मिळेल. प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी बारामतीकरांची अपेक्षा आहे.

– प्रतिनिधी, बारामती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here