

बारामतीत संतश्रेष्ठ सेना महाराज पुण्यतिथी भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरी
बारामती (प्रतिनिधी) –
“संतश्रेष्ठ सेना महाराज की जय” अशा जयघोषांनी शिवनगर परिसर दुमदुमला आणि नाभिक समाज बांधवांच्या उत्साहाने बारामतीत संतश्रेष्ठ सेना महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून भक्ती, कीर्तन, भजन व सामाजिक सलोख्याचे कार्यक्रम पार पडले. बारामती तालुका नाभिक संघटनेच्या पुढाकाराने बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी भाई कोतवाल सोसायटी येथे हा भक्तिरसाचा सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला.

भक्तिमय सुरुवात
सकाळी ८ वाजता श्री सत्यनारायण महापूजेनं मंगल सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजता पालखी सोहळ्यात टाळ-मृदंगांच्या गजरात भाविकांनी जयघोष केला. सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. राजाराम उदमले महाराज यांच्या कीर्तनात श्री संत सेना महाराजांच्या शिकवणीचा समाजहिताचा संदेश देण्यात आला. “मनुष्यदेह नाशिवंत आहे, त्याचा उपयोग परमेश्वर प्राप्तीसाठी व्हावा” या भावार्थातून भक्तांना मार्गदर्शन झाले.

भजन-कीर्तनाचा आनंद
कार्यक्रमात श्री भैरवनाथ भजनी मंडळ (उंडवडी क.प.) यांनी गोड भजन सादर केले. तर ह.भ.प. भगवान कांबळे महाराज (देवाची आळंदी) यांच्या पखवाज वादनाने भक्तांना वेगळाच आध्यात्मिक अनुभव दिला.
सन्मान सोहळा
दुपारी १२ वाजता फुले अर्पण करून संतांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजातील मान्यवरांचा ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बारामती नगरीचे विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक तथा नटराज कला मंडळाचे अध्यक्ष किरणदादा गुजर, पंचायत समितीचे गटनेते दीपक मलगुंडे, मा. उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक अभिजित सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शुभम (भैय्या) ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते अजिजभाई तसेच नाभिक समाजातील विविध पदाधिकारी व बांधव उपस्थित होते.
यावेळी किरण दादा गुजर यांनी म्हटले की आजचा जनसमुदाय एकत्रित शक्ती मोठी आहे ही कायम राहिली पाहिजेशिवाय आपण आपल्या समाज बांधवांचा प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित केला याचे समाधान वाटले या भावी पिढीने याचा आदर्श घ्यावा नक्कीच नव्या राष्ट्रनिर्मितीच्या पिढीच्या कामासाठी पारंपारिक रूढी प्रथा नुसार न राहता नव्या आणि जुन्याची सांगड करून आधुनिकीकरण कर रहावा तर देशात सार्वत्रिक राष्ट्रीय संत महात्म्याचे विचार जयंती पुण्यस्मरणाचे कार्यक्रम एका समाजापुरते न राहता सार्वजनिक आयोजिले जावे असेही ते म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चौधरी तर आभार महेंद्र यादव यांनी व्यक्त केले
महाप्रसादाची सुंदर व्यवस्था
कार्यक्रमानंतर सर्व समाजबांधव व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी सर्व नाभिक बांधवांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
बारामती व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन, भजन व महाप्रसादाचा लाभ घेतला. पुण्यतिथी सोहळा भक्ती, ऐक्य व सामाजिकतेच्या उत्साहात यशस्वीरीत्या पार पडला.