‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहू नये-तहसीलदार गणेश शिंदे
बारामती, दि.१२: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेचा गाव पातळीवरील पात्र महिलांना नोंदणी करण्यासाठी स्थानिक यंत्रणांनी मदत करावी; आपल्या कार्यक्षेत्रातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेबाबत कवी मोरोपंत सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी डाॅ.अनिल बागल, बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपक नवले, विस्तार अधिकारी सचिन धापटे, सोमनाथ लेंगरे, सुनिल जगताप आदी उपस्थित होते.
डॉ. बागल म्हणाले, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा तालुक्यातील पात्र महिलांनी ‘नारी शक्ती’ या ॲपवर ऑनलाईन नोंदणी करावी; ऑफलाईन पद्धतीने नोंदणीकरीता नजीकच्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बागल यांनी केले.
राज्यातील महिला पुरेशा सोयी -सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे , महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा आदीं योजनेचे उद्देश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. योजनेच्या पात्र व अपात्र लाभार्थी आदीं बाबींवरही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका , आशा सेविका, बचत गट समन्वयक,आपले सरकार सेवा केंद्रचालक, सेतूचालक आदी उपस्थित होते.
श्री. नवले यांनी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजने संदर्भात प्रास्तविक केले.