बारामतीत दारूच्या नशेत नगरपालिकेच्या टेम्पोने गाडीला धडक; वडील व मुलगी जखमी….
बारामती शहरात एका धक्कादायक अपघातात दारूच्या नशेत भरधाव वेगाने टेम्पो चालवून वाहन चालकाने एका गाडीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात वडील आणि त्यांची 10 वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली असून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजता फिर्यादी योगेश पोपट नाळे (वय 42, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. पाटस रोड, कैन्हया अपार्टमेंट, बारामती) हे आपल्या मुलीसह गाडीने बारामतीहून भिगवणच्या दिशेने जात होते. यावेळी पंतजली दुकानाजवळ भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे येणाऱ्या बारामती नगरपालिकेच्या 407 टेम्पोने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली
अपघाताच्या वेळी टेम्पो चालक विकास सुनिल ससाणे (वय 31, सध्या रा. जळोची, बारामती, मूळ रा. घुगल वडगाव, श्रीगोंदा) हा दारूच्या नशेत वाहन चालवत होता. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता.
या धडकेत फिर्यादी योगेश नाळे आणि त्यांची 10 वर्षीय मुलगी रसिका यांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र मोठी जीवितहानी टळली .!
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 50/2025 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 279, 337 तसेच मोटर वाहन कायद्याचे कलम 181, 184, 185 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपास अधिकारी म.पो. हवा. खेडकर हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत
अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.