बारामतीत जुन्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
बारामती (दि. 12 मार्च 2025): बारामती शहरातील देशमुख चौकात जुन्या वादातून दोन जणांनी एका व्यक्तीस मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दत्तात्रय बाळासाहेब गवळी (वय 43, व्यवसाय – कॉम्प्युटर व्यवसाय, रा. ब-हाणपूर, बारामती) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 12 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विघ्नहर्ता चहा हॉटेल समोर देशमुख चौकात आरोपी सौरभ बाबुराव जाधव उर्फ सोन्या आणि अंकुश आबाजी जाधव (दोघे रा. ब-हाणपूर, बारामती) यांनी जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादीला गाडीवरून खाली पाडले. यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फिर्यादीचा OnePlus 9 (Model 2101) मोबाईल नुकसान केला.
यावेळी सौरभ जाधव याने लोखंडी गजाने फिर्यादीच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादीच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. मारहाणीत खाली पडलेली 3,000 रुपये रोख रक्कम सौरभ जाधव याने उचलून घेतली. यानंतर आरोपींनी टीव्हीएस कंपनीच्या लाल-ग्रे रंगाच्या, बिना नंबर प्लेटच्या मोटारसायकलवरून पळ काढला.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात BNS कलम 118(2), 324(4)(5), 303(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेडकर करीत आहेत.
पुढील तपास सुरू असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
