बारामतीत कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ईव्ही ट्रॅक्टर ठरले आकर्षण
बारामती : आज बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. खानदेश भागातील जळगाव, नाशिक, धुळे आदी जिल्ह्यांसह कर्नाटक व तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांनी प्रदर्शन स्थळी मोठी गर्दी केली होती.

या कृषी प्रदर्शनास माजी महसूल मंत्री मा. श्री. एकनाथ खडसे यांनी भेट दिली. ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. राजेंद्रदादा पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मा. खडसे यांनी प्रक्षेत्रावरील विविध दालनांना भेट देत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. सोलर पॉलीहाउस, एआय आधारित कांदा, ऊस, द्राक्षे, डाळिंब प्रात्यक्षिके तसेच जनावरांचे प्रदर्शन या दालनांना त्यांनी भेटी दिल्या.

कर्नाटक राज्याचे कृषी सहसंचालक तसेच कृषी विज्ञान केंद्र (बेळगाव) येथील प्रमुख अधिकारी व शेतकरी यांनीही प्रदर्शनास भेट देत विविध नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तसेच तेलंगणा राज्याचे माजी कृषी व रेशीम आयुक्त मा. श्री. व्यंकट राम रेड्डी यांनीही या प्रदर्शनास भेट दिली.
प्रदर्शनातील बिना आवाजाचे इलेक्ट्रिक (EV) ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण ठरले. आंतरमशागत, नांगरणी, रोटावेटर आदी कामांसाठी उपयुक्त असलेल्या २७ व ३२ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली. डिझेलची आवश्यकता नसून हे ट्रॅक्टर एका चार्जिंगमध्ये सुमारे ४ तास कार्यक्षम राहतात. केवळ सुमारे २३० रुपयांच्या खर्चात चार्जिंग होत असल्याने शेतकऱ्यांचा या तंत्रज्ञानाकडे विशेष कल दिसून आला.
ज्ञानवर्धक, तंत्रज्ञानाधारित व अनुभवसमृद्ध ठरणारे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना आधुनिक, किफायतशीर व शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. हे कृषी प्रदर्शन शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.




