
बारामतीत आज सकाळी खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकला; संध्याकाळी होणार अजितदादांच्या हस्ते ऐतिहासिक लोकार्पण सोहळा
बारामती, ता. 15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, देशभक्तीची लाट आणि तिरंग्याचा डौल — हे सारे आज बारामतीत अनुभवायला मिळाले. आज सकाळी तीन हत्ती चौकातील नव्याने उभारलेल्या तीस मीटर उंच राष्ट्रध्वज स्तंभावर खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
या प्रसंगी राष्ट्रगीताच्या सुरात तिरंगा आकाशात डौलाने फडकताना पाहून उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत अभिमानाचे आणि आनंदाचे अश्रू दाटून आले. बारामतीच्या इतिहासात प्रथमच इतक्या उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला असून, हा स्तंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि सीएसआर निधीतून साकारला गेला आहे.
या स्तंभाचे संध्याकाळी साडेसहा वाजता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे. नटराज नाट्य कला मंदिरासमोर, तीन हत्ती चौक येथे होणाऱ्या या सोहळ्यात देशभक्तीपर गीत, नृत्य, फटाक्यांची आतषबाजी आणि भव्य फायर शोने देशभक्तीची उर्जा अधिकच तेजाळणार आहे.
या कार्यक्रमासाठी तीन हत्ती चौक ते भिगवण चौक मार्गावरील दोन्ही रस्त्यांवर नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही रस्ते बंद ठेवण्यात आले असून नागरिकांनी भिगवण चौक मार्गेच कार्यक्रमस्थळी यावे, असे आवाहन आयोजक किरण गुजर यांनी केले आहे.
आजचा दिवस बारामतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार हे नक्की. कारण या भव्य राष्ट्रध्वज स्तंभावर भारतीय तिरंगा आता कायमचा आकाशात अभिमानाने, डौलाने आणि दरारा दाखवत फडकत राहणार आहे.