बारामतीत – आंतर–महाविद्यालयीन ‘आविष्कार–२०२५’ संशोधन स्पर्धेला ५ व ६ डिसेंबरला उत्साहपूर्ण सुरुवात
बारामती – डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, शारदानगर आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व ६ डिसेंबर २०२५ रोजी भव्य आंतर–महाविद्यालयीन संशोधन स्पर्धा आविष्कार–२०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसांच्या संशोधन महोत्सवाची तयारी कृषी महाविद्यालय, बारामती येथे जोरात सुरू आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत येणाऱ्या १० जिल्ह्यांतील ७६ महाविद्यालयांमधील विद्यार्थी या स्पर्धेत कल्पक संशोधन, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि विविध शैक्षणिक शाखांतील (कृषी, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वैद्यक, मानववंशशास्त्र) प्रयोग सादर करणार आहेत. तरुण संशोधकांसाठी ही स्पर्धा ज्ञान, शोध आणि नवसृजनाचा मोठा व्यासपीठ ठरणार आहे.
कार्यक्रमासाठी मा. डॉ. एस. बी. खरबडे, अधिष्ठाता तथा शिक्षण संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि मा. डॉ. व्ही. आर. आवारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. शंकरराव मगर, माजी कुलगुरू व विश्वस्त, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती हे असणार आहेत. तसेच कार्यक्रमाला मा. श्री. विष्णुपंत हिंगणे, विश्वस्त, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि डॉ. अतुल अत्रे, राज्यपाल नियुक्त माजी संयोजक व निरीक्षक (आयोजन उपसमिती, महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ आविष्कार स्पर्धा) यांची मान्यवर उपस्थिती लाभणार आहे.
ही संपूर्ण स्पर्धा ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे चेअरमन माननीय श्री. राजेंद्रदादा पवार, विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण संचालक प्रा. निलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
‘आविष्कार–२०२५’मुळे बारामतीत पुन्हा एकदा ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाची मेजवानी सजणार असून तरुण संशोधकांसाठी हे व्यासपीठ नव्या कल्पनांना पंख देणारे ठरणार आहे.



