टवाळखोर मुलांवर कारवाईची मागणी
बारामती : शहरातील शैक्षणिक संस्थांच्या आसपास टवाळखोर मुले विद्यार्थी विद्यार्थिनींना त्रास देत असतात. त्यांना चाप बसविण्यासाठी संबंधित ठिकाणी पोलिस गस्त वाढवावी अशी मागणी बारामती कोचिंग असोसिएशनने पोलिस प्रशासनाकडे केली आहे. यावर पोलिस प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
बारामती शहरात विद्या प्रतिष्ठान, टी.सी. कॉलेज, सुर्यनगरी, प्रगतीनगर, मेहता हॉस्पीटलच्या आसपासच्या भागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत, या संस्थांमधून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. याच परिसरात टवाळखोर मुले विद्यार्थी, विद्यार्थिनी जातयेत असताना त्यांना त्रास देत असल्याचे दिसून येत आहे. आताच या प्रकारांना आळा घातला नाही तर पुढे जाऊन गंभीर परिणाम होऊ शकतात, यासाठी पोलिस प्रशासनाने या परिसरात गस्त वाढवावी. अशा टवाळखोर मुलांवर लक्ष ठेवावे या मागणीसाठी बारामती कोचिंग असोसिएशच्या सदस्यांनी आज बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांची भेट घेतली.
वैशाली पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून अशा योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. याखेरीज आपल्या परिसरात असा कोणताही प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले तर कळवा, पोलिस कर्मचारी तातडीने तिथे येऊन कारवाई करतील असेही त्यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक संध्या भगत व सुवर्णा गायकवाड यावेळी उपस्थित होत्या.
बारामती शहर पोलिस स्टेशन तसेच उपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालयासही याबाबत संपर्क साधला जाणार असल्याचे बारामती कोचिंग असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.
