बारामतीतील उद्योजकांसाठी दिल्ली अभ्यास दौरा
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने बारामती परिसरातील उद्योजकांसाठी नवी दिल्लीत यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे इंडिया मशीन टूल्स शो हे भव्य औद्योगिक मशिनरी प्रदर्शन पाहण्यासाठी 13 ते 17 मे दरम्यान अभ्यास दौरा आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.
देशाची राजधानी दिल्लीत देश विदेशातील अत्याधुनिक मशीनरीचे उत्पादक त्यांचे विविध उत्पादने वेळोवेळी प्रदर्शित करत असतात. आत्ताच्या इंडिया मशीन टूल्स शो प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण लहान मोठ्या मशिनरी एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उद्योजकांना उपलब्ध झाली आहे. देशातील नामांकित मशिनरो उत्पादकां बरोबरच परदेशी कंपन्या देखील यात सहभागी होणार असल्याने जागतिक दर्जाच्या यंत्रसामग्री उद्योजकांना पाहण्यास मिळणार आहेत.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या नेतृत्वखालील उद्योजकांचे शिष्टमंडळ 13 मे रोजी दिल्लीकडे रवाना होणार असून प्रदर्शन पाहून दिल्ली परिसरातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार आहेत.
स्टार्टअप नवीन उद्योजक व प्रस्थापित उद्योजकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मशिनरीचे उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची उत्तम संधी या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या दिल्ली अभ्यास दौऱ्यात सहभागी व्हायचे असल्यास बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे खजिनदार अंबिरशाह शेख वकील यांच्याशी 9579302303 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदवण्याचे आवाहन अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केले आहे.
