बारामतीचा सन्मान! प्राचार्य डॉ. भरत शिंदे ‘प्रिन्सिपल ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवित

0
66

बारामतीचा सन्मान! प्राचार्य डॉ. भरत शिंदे ‘प्रिन्सिपल ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवित

प्रतिनिधी, पुणे | १८ मे २०२५

पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या ८व्या हायर एज्युकेशन, इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी समिट अँड अवॉर्ड्स या राष्ट्रीय स्तरावरील भव्य सोहळ्यात विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत पंढरीनाथ शिंदे यांना ‘प्रिन्सिपल ऑफ द इयर फॉर इन्स्टिट्यूशनल एक्सलन्स’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Plus 91 Media यांच्या आयोजनाखाली आणि भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, NSDC, NCVET, Skill India यांच्या सहकार्याने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्राचार्य डॉ. शिंदे यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या शैक्षणिक, प्रशासकीय व समाजाभिमुख योगदानाची ही राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाविद्यालयाने NAAC कडून A+ दर्जा प्राप्त करत सर्वांगीण गुणवत्तेचा नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास, रोजगारक्षमतेत वाढ, तंत्रज्ञान साक्षरता आणि सामाजिक बांधिलकी या बाबतीत त्यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

महाविद्यालयात AI आधारित प्रयोगशाळा, ४० हून अधिक स्मार्ट बोर्ड्स, सीसीटीव्ही यंत्रणा, आधुनिक ग्रंथालय, सुसज्ज सेमिनार हॉल्स आणि भव्य क्रीडांगण अशा सुविधांची निर्मिती करण्यात आली. मागील काही वर्षांत सुमारे १००० विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात यश आले असून ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.

डॉ. शिंदे यांनी आजवर ८० पेक्षा अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित केले असून ३५ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १४ पीएच.डी. विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली आहे. संशोधन आणि गुणवत्ता विकासासाठी त्यांनी केलेले कार्य राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय मानले जाते.

यापूर्वीही त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आणि हिंद सेवा मंडळाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे बारामतीचा ‘शैक्षणिक मॉडेल’ म्हणून गौरव केला जात आहे.

हा पुरस्कार म्हणजे केवळ डॉ. शिंदे यांचा वैयक्तिक सन्मान नसून, तो बारामतीच्या शिक्षणसंस्कृतीचा गौरव आहे. अशा प्रेरणादायी नेतृत्वामुळे बारामतीच्या शिक्षणाचा झेंडा आज राज्य व देशपातळीवर उंचावत आहे. प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here