बारामतीकरांसाठी साहित्यिक मेजवानी: अरविंद जगताप यांचे ‘पत्रास कारण की’ व्याख्यान
बारामतीकरांच्या अभिरुचीला समृद्ध करणाऱ्या आणि प्रतिभावंतांशी संवाद साधण्याची संधी देणाऱ्या एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया तर्फे आयोजित ‘प्रतिबिंब व्याख्यानमाला’ यंदा एका खास व्यक्तिमत्त्वाच्या उपस्थितीने सजणार आहे.
जेष्ठ लेखक, कवी आणि पटकथा संवादलेखक अरविंद जगताप बारामतीकरांच्या भेटीस येत असून, ‘पत्रास कारण की’ या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत.
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, ठाकरे, ये रे ये रे पैसा, तू ही रे यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे लेखन, तसेच झेंडा, गोष्ट छोटी डोंगरावढी या चित्रपटातील गीते, चला हवा येऊ द्या या मालिकेतील पत्रलेखन, आणि ‘पत्रास कारण की’, ‘सेल्फी’ यांसारखी लोकप्रिय पुस्तके यांनी रसिक वाचक आणि प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालणाऱ्या अरविंद जगतापांचा हा कार्यक्रम बारामतीकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.
रविवार, 23 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता, विद्यानगरी येथील गदिमा सभागृहात हा विशेष व्याख्यानप्रसंग रंगणार आहे.
या आगळ्या वेगळ्या व्याख्यानाचा अनुभव घेण्यासाठी सर्व बारामतीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले आहे.
संवाद, साहित्य आणि विचारांची मैफल अनुभवण्याची संधी सोडू नका!

