बाजार समित्यांचे 24 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन
पुणे, दि. 21: पणनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती आदींसोबत बाजार समितीच्या कामकाज व त्यामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने 24 फेब्रुवारी 2025 रोजी बंटारा भवन, बाणेर येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन होणार आहे. पणनमंत्री जयकुमार रावल, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक, सचिव उपस्थित राहणार आहेत.
मंडळाने पणन विकासासाठी आजपर्यंत केलेले कामकाज, राज्यातील बाजार समित्यांचे कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोई-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना तसेच राज्यातील बाजार समित्यांचे आधुनिकीकरण, बाजार समितीनिहाय विकास आराखडा, बाजार समित्यांना त्यांचे दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अ़डीअडचणी व उत्पन्न वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना आदी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली आहे.
ooo
