प्रशासन,पोलिस प्रशासन स्वतःचा बडेजाव प्रदर्शित करण्यासाठी मनुष्यबळाचा गैरवापर करून समाजाच्या घामाच्या पैशाचा चुराडा का करतात? जनतेचे सेवक म्हणवून जनसेवेचा आव आणत सरकारी अखत्यारीतल्या जनतेच्या तिजोरीचे ते मालक आहेत का? आम्ही कुणाचे नोकर नाही शासनाचे कर्मचारी आहोत एवढी मग्रूरी आज पोलिस ठाण्यातील अनेक कनिष्ठ दर्जाचे अधिकारी आणि कर्मचारी करायला लागलेले आहे.स्वत:च्या तोऱ्यात वागणाऱ्या अकोला पोलिस अधिक्षकांनी याकडे थोडं तरी लक्ष आहे का? हे पोलिस प्रशासनाचं यश आहे की अपयश?
अकोल्याची प्रचंड ढासळलेली कायदा सुव्यवस्था,बोकाळलेली गुन्हेगारी, अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आर्थिक सेटींगच्या मतलबातून गुन्हे न नोंदवता निरपराधांवर अन्याय,गुटखा विक्री,दारू आणि अनैतिक धंद्याकडे पोलिस अधिक्षक आणि प्रशासनाचे हेतूपुरस्सर साफ दुर्लक्ष आहे.पत्रकार संरक्षण कायदा,महिला अत्याचार, जादुटोणा विरोधी अशा अनेक कायद्यांना अकोला पोलिसांनी गुंडाळून ठेवलेले आहे.कर्तव्याशी प्रतारणा करून हे पोलिस अधिक्षक महाशय स्वतःचा तोरा प्रदर्शित करण्यात धन्यता मानत असतील तर अशी नियमबाह्य कामे करणाऱ्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर गृहखात्याने कारवाई केली पाहिजे. अकोला जिल्हावासियांना न्याय दिला पाहिजे...!
* संजय एम.देशमुख,संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ,अकोला
