‘प्रतिक्रिया’ ऐवजी ‘प्रतिसाद’ दिला पाहिजे…
समझे बिना तुरंत प्रतिक्रिया देना
दुर्बल मनुष्य का लक्षण है…
महाराष्ट्र राज्यस्तरावरच नव्हे तर देशपातळीवर सुध्दा विविध विषयानुसार प्रतिक्रीयांचा पाऊस पडत आहे. यामध्ये सर्वच क्षेत्राचा समावेश असला तरी प्रामुख्याने राजकारणातील प्रतिक्रिया बहुचर्चित ठरतात. समाजात यावर विचार व्यक्त होणे, प्रतिसाद व पडसाद व्यक्त होणे, काही वेळा तर निदर्शने, बंद, मोर्चे, धरणे आदी आंदोलनेही केली जातात. कोणाची क्रिया व कोणाची प्रतिक्रिया कशी योग्य की अयोग्य, चूक की बरोबर, यावर समाजात दोन गट पडतात. तर अनेक वेळा चुकीचे असले तरी तेच कसे बरोबर? हे सांगण्याचे समर्थकांकडून प्रयत्न केले जातात.
प्रत्यक्षात चुकले आहे, माफी मागणे, दिलगीरी व्यक्त करणे, असे औदार्याचे प्रकार सहसा होत नाही. कालांतराने प्रतिक्रियेचे प्रकरण गंभीर होते किंवा थंड पडते, एवढे मात्र होत असते. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या, संत महात्म्यांच्या व अभिनेत्यांच्या प्रतिक्रिया ह्या तरी समाजहिताच्याच असाव्यात, अशी सुज्ञांची अपेक्षा गैर ठरत नाही. मात्र असे होत नाही, हे दुर्देवच म्हणावे लागेल. तर हे असे उलट का होते? याचे सर्व्हेक्षण केले तर त्यामधून ‘हे राजकारणासाठी होते,’ व ‘प्रसिध्दी माध्यमांनी दखल घ्यावी म्हणून असे केले जाते,’ असे उत्तर २० ते २५ टक्के लोकांकडून मिळते. काही तरी आक्रमक, परखड व असंसदीय, अपशब्द, शिव्याशाप दिल्याशिवाय मीडिया लक्ष देत नाही, नोंद घेत नाही, दाखवत नाही, छापत नाही,’ असे म्हणणे समोर येते. तर हे कोणीही पूर्णपणे नाकारु शकत नाही, म्हणजेच मीडियाने नोंद घेऊन हे थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असाही सूर निघतो.
वास्तविक प्रतिक्रिया ही क्रियावर आधारित असते. क्रियेला अर्थात घटना, घडामोडी, वक्तव्याला दिलेले ते त्वरीत उत्तर असते. प्रतिक्रीया अचानक व टोकाची व उत्स्फूर्त असल्याने त्यातून चीड, संताप, विरोध, शिव्या आदी व्यक्त होतात. आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी वादाला कारणीभूत ठरतात. शब्दाने शब्द, भांडणाने भांडण वाढत जाते तर पर्यायाने सामाजिक शांतता भंग होते. सार्वजनिक क्षेत्रातील हेच प्रकार घर संसारात, कुटुंबात, प्रतिष्ठाने, व्यापार क्षेत्रातही ‘प्रतिक्रिया’ मुळे घडतात. यातून शांतता भंग होते. प्रत्यक्षात प्रतिक्रियेला नियंत्रीत करण्यासाठी तज्ञांच्या मते ‘प्रतिसाद’ हे एक समर्पक उत्तर आहे. प्रतिक्रियालाच रिएक्शन, रिएक्ट करणे हे इंग्रजी शब्द प्रचलीत आहे तर या उलट प्रतिसादाला फीड बॅक, रिस्पाँड हे शब्द प्रचलीत आहेत.
प्रतिक्रियेला प्रतिसाद म्हणजे कोणत्याही क्रियेला दिलेले विचारपूर्वक उत्तर असते. थोडा वेळ घेऊन केलेली क्रिया असते. विचारपूर्वक मांडणी यामध्ये केली जाते. त्यामुळे प्रतिसादातून समस्या निर्माण होत नाहीत. उलट परिस्थितीवर विचार करुन तोडगा काढल्या जातो. स्वहितासोबतच परहिताचा विचार प्रतिसादाव्दारे केला जातो. त्यामुळे प्रतिक्रिया पेक्षा प्रतिसाद देणे खूप महत्त्वाचे असते.
काही दिवसांपूर्वी डॉ.संजय उपाध्ये यांची ‘प्रतिक्रिया आणि प्रतिसाद’ आणि मन: शांती,’ व्हिडिओ क्लीप पाहिली होती. त्यांनी अनेक उदाहरणांसह प्रत्येकाने प्रतिसाद द्यायला शिकले पाहिजे, प्रतिक्रियेतून प्रतिसादाकडे गेले पाहिजे, नेहमी ‘प्रतिसाद’ मध्ये असावे. असे म्हटले आहे, जे दैनंदिन व्यवहारात जगणे सुकर करणारे म्हणता येईल.
कुटुंबात, नातेवाईकात तर नेहमी प्रतिक्रिया देऊन त्वरीत, घाई घाईने व्यक्त होण्यापेक्षा शांततेने, विचारपूर्वक प्रतिसाद देणे, कधीही चांगले मात्र ही एक प्रक्रिया आहे. यात परिस्थीतीशी जुळवून घ्यावे लागते, समोरच्या घटना, घडामोडी मागील भावना, उद्देश, चलाखी आणि बदमाशी समजून घ्यावी लागते. तर प्रतिसाद ही प्रक्रिया एक सवय व्हावी, यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रतिसाद देणे जमले की मग आनंद उपभोगता येतो. कारण ‘झालं गेलं विसरुन जा,’ अशी सवय आपोआप जडते. जी कौटुंबिकदृष्ट्या फायद्याची ठरते.
राजकारणात कोणत्याही क्रियेवर तटस्थ राहणे हे त्रयस्थ राहण्यासारखे होईल, मात्र लगेच प्रतिक्रियेसाठी तत्पर राहिल्यापेक्षा विचारपूर्वक प्रतिसादासाठी तयार राहणे हेच सर्वहिताचे ठरेल, एवढे मात्र खरे!
सार्वजनिक जीवनात प्रतिक्रिया देणे गरजेचे असेल तर किमान कोणत्या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे, या आशयाच्या ओळी आठवतात…
बोलना और प्रतिक्रिया करना जरुरी है लेकिन,
संयम और सभ्यता का दामन नही छुटना चाहिये…
- - - राजेश राजोरे
मो.नं. : ९८२२५९३९०३