पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सुधारणेसाठी राष्ट्रीय स्तरावरील समितिची बुधवारी बैठक
पुणे,दि.२८:- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सांख्यिकी माहितीतील सुधारणेसाठी निर्देश देणारी टेक्निकल कमिटी ऑफ डिरेक्शन (टीसीडी) ही केंद्र शासनाची सर्वोच्च समिती आहे. या समितीची सन २०२४-२५ या वर्षातील बैठक बुधवार व गुरुवार, २९ व ३० जानेवारी,२०२५ रोजी महासंचालक (सांख्यिकी), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली श्री . काल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली रिजेंटा ग्रँड हॉटेल, चिंचवड,पुणे येथे संपन्न होणार आहे. देशातील सर्व राज्यांमधील तसेच केंद्र शासनातील पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय सांख्यिकी विभागाशी संबंधित अधिकारी या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
एकात्मिक नमुना पाहणी सर्वेक्षण अंतर्गत संकलित करण्यात येणारी दुध, अंडी, मांस व लोकर या प्रमुख उत्पादनांच्या २०२५-२६ मधील लक्ष्यांवर चर्चा करणे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सांख्यिकी अर्थव्यवस्थेतील माहिती निर्देशकांमधील उणीवा शोधून त्यावरील योग्य उपाय सुचविणे, केंद्र व राज्य शासनाने अनुसरावयाच्या सांख्यिकी पद्धती याबाबत चर्चा व सूचना करणे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय करीता आयोजित पाहणी योजना, पशुधन गणनेसाठी मार्गदर्शन करणे या विषयांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महासंचालक (सांख्यिकी) आरोग्य व कुटुंब कल्याण, भारत सरकार श्री. काल सिंग, यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य डॉ. प्रवीणकुमार देवरे, सल्लागार, पशूसंवर्धन व दुगधव्यवसाय विभाग, भारत सरकार श्री. जगत हजारीका, प्रधान संशोधक, एकात्मिक पाहणी योजना, नवी दिल्ली डॉ. तन्वीर अहमद यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न होणार आहे असे सहसंचालक (सांख्यिकी) सुषमा जाधव यांनी कळविले आहे.
०००