पत्रकार आणि समाजाच्या प्रश्नांसाठी व्यापक संघटनशक्ती आवश्यक – संजय एम. देशमुख
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५ वा मुंबई मेळावा संपन्न – पदाधिकारी सन्मान व ओळखपत्र वितरण
अकोला: पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसोबतच समाजातील अन्याय आणि समस्या सोडवण्यासाठी व्यापक संघटनशक्ती निर्माण करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रभर प्रभावी सभासद नोंदणीद्वारे दबावगट उभारण्याचे उद्दिष्ट लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने ठेवले आहे. पत्रकार हक्क आणि कल्याणाच्या लढ्यात समाजाचाही पाठिंबा मिळविण्याचा महासंघाचा संकल्प आहे. पत्रकारांनी फक्त नेत्यांना मोठं करण्यासाठी लेखणी न वापरता, स्वतःच राजकीय प्रवाहात उतरण्याची गरज असल्याचे मत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी व्यक्त केले.
मुंबई येथे आयोजित लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ५ व्या विचारमंथन मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय मार्गदर्शक पुष्पराज गावंडे, महाराष्ट्र संघटक अरविंदराव देशमुख, मुंबई प्रदेश संघटक आणि मंत्रालयीन समन्वयक रफिक मुलानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
संघटनेच्या सक्षम नेतृत्वाचा गौरव
कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना उपप्रमुख व आरोग्य समन्वयक विकास भोसले यांनी संजय देशमुख यांना संघटनेसाठी एक सक्षम व योग्य नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार काढले.
महत्वाच्या घडामोडी आणि श्रद्धांजली अर्पण
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या प्रतिमांना वंदनाने झाली. तसेच, शहीद जवान, अत्याचारग्रस्त महिला, दिवंगत पत्रकार, शेतकरी, हिंसाचार बळी आणि आपत्तीग्रस्तांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आमदार सुनिल प्रभूंना ‘लोक स्वातंत्र्य समाज रत्न’ पुरस्कार
संघटनेच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल आमदार सुनिल प्रभूंना “लोक स्वातंत्र्य समाज रत्न गौरव” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पदाधिकारी सन्मान आणि ओळखपत्र वितरण
संघटनेत सक्रिय योगदान दिलेल्या अरविंदराव देशमुख, सौ. सुषमा ठाकूर, पंजाबराव देशमुख, जगदीश प्रसाद करोतिया, संतोष घरत आणि देवेन्द्र मेश्राम यांना प्रोत्साहनपर स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी संघटनेच्या नव्या आणि नूतनीकरण केलेल्या ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास ठाणे जिल्हा संघटक संजय सोळंके, अंधेरी संघटक राजीव विश्वकर्मा, उमेश चौधरी, चेंबूर नाका शिवसेना उपप्रमुख व आरोग्य समन्वयक विकास भोसले, अनिता देशमुख आणि सौ. छाया मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन सौ. सुषमा ठाकूर यांनी केले.
