निर्यातक्षम पिकांच्या उत्पादनवाढीसाठी जिल्ह्यात कालबद्ध कार्यक्रम राबवा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

0
14

निर्यातक्षम पिकांच्या उत्पादनवाढीसाठी जिल्ह्यात कालबद्ध कार्यक्रम राबवा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. 2: निर्यातक्षम पिकांच्या उत्पादनवाढीच्यादृष्टीने कृषी विभाग, आत्मा यंत्रणेने कृषितज्ज्ञ, शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्ह्यात कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत त्यांनी निर्देश दिले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, कृषी उपसंचालक संजय विश्वासराव यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. डूडी म्हणाले आगामी तीन वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याच्यादृष्टीने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी, सूर्यफूल, करडई यासारख्या पिकांचा सामूहिक पद्धतीने विकास करण्यावर भर देण्यात यावा. कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत प्रथम शेतकऱ्यांची निवड करुन त्यांना कृषी विभाग आणि आत्माच्या मदतीने प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. प्रशिक्षित शेतकऱ्यांमधूनच गावात ‘मास्टर प्रशिक्षक’ म्हणून जबाबदारी देण्यात यावी. शेतकऱ्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विचार करुन कृषी विभाग आणि आत्मा मिळून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येतील.

कालबद्ध कार्यक्रमाच्या जनजागृतीकरीता जिल्हा, तालुका व गावनिहाय सभेचे आयोजन करुन शेतकऱ्यांना पीक पद्धती, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), पाणी बचत आदीबाबत मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी ‘एआय’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्यांचे उत्पादकता वाढवून पर्यायाने उत्पादन वाढीकरीता प्रयत्न करावे, असेही श्री. डूडी म्हणाले.

श्री. काचोळे यांनी जिल्ह्यातील विविध भागात उत्पादित होणाऱ्या पिकांबाबत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here