नाद केला पण वाया नाही गेला….लेखन :- भाषणकला प्रशिक्षक शशांक मोहिते (सर)

0
271

भाषणकला

नाद केला पण वाया नाही गेला….
हो, हे खरेच तर आहे. कोणाला एखाद्या वाईट गोष्टीचा चुकून नाद लागला तर तो एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करु शकतो. पण तोच नाद जर चांगल्या गोष्टीचा असेल तर तो फक्त त्या व्यक्तीचेच नव्हे तर परिवाराचे,समाजाचे, गावाचे आयुष्य समृध्द करु शकतो.हि छोटी गोष्ट आहे चांगला नाद केलेल्या राजूभाऊची…

गेल्या २४ वर्षांपासून राजू बडदे हे सोमेश्वर कारखाना परिसरातील करंजेपुल येथे चहाचे छोटे हाॅटेल चालवितात. कष्टाच्या बळावर त्या हाॅटेल च्या उत्पन्नावर त्यांनी तेथेच पाठीमागे चांगली ३ मजली इमारत बांधली तो भाग वेगळा. त्या इमारतीत सध्या गणेश सावंत सर ‘विवेकानंद स्पर्धा परिक्षा तसेच पोलिस भरतीपुर्व मार्गदर्शन वर्ग व अभ्यासिका’ चालवतात. राजू बडदेंनी भाड्याने दिलेल्या या वास्तूतील गणेश सावंत सरांच्या मार्गदर्शनामुळे साठ विद्यार्थी पोलिस झाले तर २१ विद्यार्थी इतर विविध अधिकारी पदांवर नियुक्त झाले आहेत. पहा, भले तो त्यांच्यासाठी समाजसेवेसोबतच उत्पन्नाचा मार्ग असणारा व्यवसाय का असेना पण त्यांनी सकारात्मक विचाराने या गोष्टी सुरू होण्यास बळ दिले अन ८१ तरुणांचे आयुष्यदेखील घडले.

पण माझ्या पोस्टचा मुद्दा तोही नाही. या राजू बडदेंना कोविडच्या काळात चहाचे हाॅटेल पुर्ण वेळ बंद ठेवावे लागले. रिकाम्या वेळेची कधीच सवय नव्हती. अशातच पत्रकारमित्र संतोष शेंडकर यांच्यामुळे त्यांना एक नाद लागला. या नविन नादामुळे राजू बडदे आता देहभान हरपून त्यात वेळ द्यायला लागले. थांबा थांबा, घाबरू नका. हा नाद दारू,बिडी,तंबाखूचा नव्हता बरं ? हा नाद होता पुस्तकं वाचण्याचा.. त्या काही महिन्यांत त्यांनी संतोष शेंडकर यांच्या वैयक्तिक संग्रहातील पस्तीस ते चाळीस पुस्तके वाचली. पण त्यांची भूक काही भागेना. मग त्यांनी सोमेश्वर कारखान्याच्या वाचनालयाचे सभासदत्व घेतले. आणखी चाळीस पुस्तके परत एकदा झपाटल्यासारखी वाचून काढली. हळुहळु ते पुस्तकांवर गप्पा मारायला लागले. हे पुस्तक आवडले, त्यात या विषयाची लई भारी माहिती आहे. पुढील काळात इतर लोकांनी उत्सुकतेपोटी आम्हालाही ते पुस्तक खरेदी करायचे असून तुम्हीच ते उपलब्ध करुन द्याल का अशी विचारणा केली. त्याच दरम्यान राजूभाऊने लोणी भापकर येथील भापकर सरांकडची अंधश्रध्दा निर्मुलन समितीची सगळी पुस्तके वाचली होती. एक दोन व्याख्यानांच्या कार्यक्रमात अंनिसच्या पुस्तकांचा स्टाॅल लावण्याचा अनुभव राजू बडदेंच्या गाठीशी होताच. मग काय, आता राजूभाऊने आपल्या नेहमीच्या चहाच्या हाॅटेलमधील काऊंटरजवळच पुस्तके ठेवायला नविन कपाट तयार करून घेतले. हळुहळु तेथे चहा प्यायला येणारे आवडीने पुस्तकेही विकत घ्यायला लागले. तर पुस्तके खरेदीला येणारे त्यांच्या चहाचेही शौकिन झाले. सोमेश्वर कारखाना परिसराला शेती, सहकार, शिक्षण, सांस्कृतिक, क्रिडा या सर्वच बाबतीत चांगला वारसा आहे. या परिसरात शेतकरी, मजुर, कामगार, पुढारी, व्यावसायिक, शिक्षक,संशोधक,नोकरदार अशा सर्वच क्षेत्रांतील व्यक्ती आहेत. तसेच या परिसरातील सर्वच लहानथोर मंडळी बौध्दिक उपक्रमांतही नेहमीच आघाडीवर असतात. त्यामुळे अशा पध्दतीचे पुस्तक विक्रीचे दुकान या परिसरात सुरु झाल्यावर त्याला अपेक्षेप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या राजूभाऊंनी मागील वर्षभरात चहासोबतच तब्बल १ लाख रुपये किंमतीच्या पुस्तकांची विक्री केली आहे. आता बोला, नाद केला पण वाया गेला असे आपण या केसमध्ये म्हणू शकतो का ?
नाही ना, अगदी बरोबर…
मित्रांनो, काही नाद चांगले असतात. ते स्वतःसोबत समाजाचेही जगणे समृध्द करतात. त्यासाठी मित्रही तसेच निवडायला हवेत. होय ना ?

( छायाचित्रात – दैनिक सकाळचे सोमेश्वरनगर प्रतिनिधी संतोषजी शेंडकर, सेंद्रीय शेती करून पेरुचे उत्पन्न घेणारे नितीन माने, दैनिक केसरीचे प्रतिनिधी Adv.गणेशजी आळंदिकर, माझा हात ज्यांच्या खांद्यावर आहे ते आपले ‘नाद केला पण वाया नाही गेला’ वाले राजू बडदे, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी महेशजी जगताप, वाघळवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच Adv. हेमंत गायकवाड.)
या छायाचित्रात आमचे जुने मित्र दत्ताकाका माळशिकारे यांना त्यादिवशी माझ्याकडूनच संपर्क न झाल्याने ते दिसत नाहीत. पण त्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे फोटो अजुन वजनदार आला असता. दत्ताकाका साॅरी. पुढील वेळेस तुम्ही म्हणाल तो दंड…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here