नमो महारोजगार मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे १० हजार उमेदवारांची निवड
बारामती, दि.२: विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी तसेच १८ हजार ७५४ उमेदवारांनी सहभाग घेतला असून त्यापैकी ८ हजार ७१६ उमेदवारांची प्राथमिक तर १ हजार ७३ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.
मेळाव्यात युवकांच्या नवनवीन संकल्पनांना प्रोत्साहन देणारे १७ स्टार्टअप उपस्थित होते. त्यांच्यामार्फत उमेदवारांच्या नव संकल्पनाना बळ देण्यासाठी आणि उद्योजकीय संकल्पना वाढीस लागण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणाची आवड निर्माण होण्याकरिता २६ स्टॉलद्वारे विविध कौशल्यांची तोंडओळख करून देण्यात आली.
मेळाव्यासाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते. उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीसाठी संबंधित अस्थापनेकडे पाठविण्यात येत होते. त्यांच्यासाठी आवश्यक सुविधाही करण्यात आल्या होत्या. तालुक्याचे ठिकाण असूनही मेळाव्याला तरुणांनी सकाळपासून गर्दी केली होती.
स्वयंरोजगाराच्या व वित्तपुरवठा करणाऱ्या शासकीय विविध योजनांविषयीची माहिती देण्याकरिता सर्व महामंडळांची, बँकाचे, स्मार्ट, मॅग्नेट, पोस्ट ऑफिस, सारथी, देअसरा फाऊंडेशन, इंक्यूबेशन सेंटर, टेक्स्टाइल पार्क, जिल्हा उद्योग, खादी ग्रामोद्योग आदी २५ स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले.
रविवार ३ मार्च रोजीदेखील उमेदवारांना मेळाव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील. त्यासाठी मेळाव्याच्या ठिकाणी नोंदणी करता येईल. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.