दया नको, या आज्जीच्या हिमतीला बळ द्या
मला एका व्हाट्सअप ग्रुप वर वाचण्यात आला त्यावरून हा लेख मी फॉरवर्ड करायचे ठरवले आपणही फॉरवर्ड कराल….!
आज स्वारगेट बसस्थानकावर या आजी भेटल्या.वय पंच्च्याहत्तरीच्या पुढे असावं.देह थकलेला.आजीला Parkinson(कंपवाताचा ) त्रास असावा.कारण हात सारखे थरथरत होते,आवाज खोल गेलेला.बोलणे अस्पष्ट ,काय बोलतात ते समजत नाही.परिस्थितीवश अशी वृध्द माणसे लोकांच्या दयेच्या भावनेला साद घालतात,समोर हात पसरताना दिसतात.त्यांच्या असहाय परिस्थितीमुळे माणसे द्रवतात आणि हातावर पैसे टेकवतात .पण ही आज्जी अशी हिंमत हारणारी नाही.त्या हात पसरत नाहीत तर स्वावलंबनाचा आदर्श ऊभा करतात.बसस्थानकावर वर्तमानपत्र विकायचं काम करतात.सतत थरथरणार्या हातांपैकी एका हातात वर्तमानपत्रांचा गठ्ठा आणि दुसर्या हातात मनगटात अडकवलेली पिशवी घेउन आज्जी प्रवाशांसमोरुन फिरत असते.त्यांच्याकडून एक पेपर विकत घेतला.सात रुपये किंमत सांगत होत्या ,कळत नव्हते.शेवटी पेपरवर किंमत पाहून त्यांना पैसे दिले.बारामतीच्या तिकीट रांगेत एक युवक उभा होता.त्याने पन्नासची नोट देऊन टाईम्स विकत घेतला.आज्जी काहीतरी बोलत होती.समजत नव्हते.त्यांनी हातानी केलेल्या खुणा लक्षात आल्या.सुट्टे परत देते हे खुणेने सांगत होत्या.तो तरुण आज्जी राहू द्या,नका देऊ परत असे सांगू लागला.आज्जीने तिथेच जागेवर बसकण मारली.डाव्या हातात अडकवलेल्या पिशवीतून सुट्टे पैसे काढून त्याला परत दिले.आणि कष्टपूर्वक उभी राहत पुन्हा रांगेकडे मोर्चा वळवला.
त्या निर्मोही, देहाने थकलेल्या पण मनाने कणखर असलेल्या आज्जीकडे अचंबित होउन पहात राहिलो.हातपाय चालताहेत तोवर काम करत राहीन,कोणापुढे हात पसरणार नाही असा डायलाॅग आपण अनेकांकडून ऐकतो,आपणही अनेकांना कधी कधी बाणेदारपणे हे बोलून दाखवतो.त्याचं मूर्तिमंत उदाहरण समोर दिसत होतं.साधारण परिस्थिती असलेल्या,थकल्या भागल्या आजीची धडपड, स्वाभिमानी बाणा खूप काही शिकवून गेला.त्या आज्जीबाईला दया नको,उलट तिच्याकडून खूप काही घेण्यासारखं,शिकण्यासारखं आहे.बिकट अडचणींचा बाऊ न करता ती माऊली धडपडते आहे.तिच्यासाठी एक नक्की करु यात.सकाळच्या वेळी स्वारगेटला गेलात तर तिच्याकडून एक पेपर नक्की विकत घ्या.आपल्या परिचितांना,नातेवाईकांना आवर्जून सांगा.तुम्ही बसने प्रवास करणारे नसाल तरी खास आज्जीला भेटण्यासाठी स्वारगेट स्थानकावर जा.तिच्या जिद्द आणि धडपडीची कदर करण्यासाठी ती फलाटावर असेल तिथून पेपर नक्की विकत घ्या.तिला पेपरचे गठ्ठे हातात घेउन फिरावं लागू नये,जिथे कुठे ती असेल त्या जागी तिच्याकडून पेपर विकत घेतील अशा ग्राहकांची साखळी तयार करु यात. ‘ तेथे कर माझे जुळती ‘ या भावनेने आज्जीच्या धडपडीला प्रसिध्दी आणि प्रतिसाद देऊ यात. सलाम त्या मातेला … तिच्यातील त्या परकष्ठाच् जिद्दीला…
