तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न…!

0
4

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

“नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय, बहुविद्याशाखीय शिक्षणाची दारे उघडी झाली असून बहुआयामी कौशल्य प्राप्त करण्याची संधी मिळते आहे.  त्या करिता विदयार्थ्यांच्या आताच्या पिढीने सजग राहायला हवे व भविष्याच्या यशाची स्वप्ने रंगवताना वर्तमान क्षणाची जाणीव ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांची खरी जडणघडण हि महाविद्यालयीन जीवनामध्ये होत असते. या महाविद्यालयामधील अद्ययावत व सुसज्ज इमारती, प्रयोगशाळा, उत्तम परिसर, तज्ञ शिक्षक वर्ग पहात असताना हे महाविद्यालय भविष्यात एनआयआरएफ रँकिंगमध्ये टॉप लिस्ट मध्ये असेल इतकेच नव्हे तर वर्ल्ड मॅप मध्ये देखील हे महाविद्यालय अग्रभागी असेल अशी आशा व्यक्त केली. या स्वायत्त महाविद्यालयातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी घेऊन हे विद्यार्थी बाहेर पडत आहेत ही भाग्याची गोष्ट आहे”  असे प्रतिपादन विज्ञान कथा लेखक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यापरिषदेचे सदस्य प्रा.डॉ.संजय ढोले यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

               त्याचप्रमाणे ते पुढे असेही म्हणाले की, नवनवीन विज्ञान संशोधन होत आहे परंतू त्याचबरोबरीने ह्यूमॅनिटीज शाखेचे मोलाचे व अत्यंत महत्वाचे योगदान आहे. कारण समाजामध्ये चांगले विचारवंत चांगले साहित्यिक निर्माण होणे तितकेच गरजेचे आहे.  या साहित्यामुळे मानवता टिकून आहे.   

              कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थान  अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार  मा.श्री.विकास शहा लेंगरेकर यांनी भूषविले.  कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप यांनी केले तर वार्षिक अहवाल वाचन गुणवत्ता पारितोषिक वितरण समिती प्रमुख प्रा.सदाशिव पुराणिक यांनी केले.

या वेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे खजिनदार श्री.विकास शहा (लेंगरेकर) यांनी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विदयार्थ्यांनी महाविद्यालयाला सार्थ अभिमान वाटेल अशी जागतिक स्तरावर कामगिरी केली आहे असे गौरवपूर्ण उदगार काढले. येथून पुढेही विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्चप्रतीच्या ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करावेत अशी सदिच्छा व्यक्त केली व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

यावेळी २०२४-२५ शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केलेल्या यशस्वी विदयार्थ्यांचा गौरव एकूण रक्कम रुपये १,९०,००० ची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.लेफ्ट.डॉ.विवेक बळे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा.डॉ.सचिन गाडेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य, रजिस्ट्रार, अधिष्ठाता तसेच कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.दर्शन शहा  गुणवंत विद्यार्थी, पालक,  प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here