डॉ.बाबासाहेब…अस्मितेचं धगधगतं अग्निकुंड
रंजल्या गांजलेल्या, पीडित,दलित, शेतकरी,मजूर, स्त्री व शोषित वर्गाच्या उध्दारार्थ अहोरात्र झटणाऱ्या आणि समतेची ,समानतेची व हक्कांची वागणूक मिळवून देणा-या,मानवतेची दिव्यज्योत, घरात अंगणात भारतीयांच्या मनामनांत अखंडपणे तेवत ठेवायला लावणा-या थोर व महान अशा महापुरुषांच्या यादीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सर्वात वर घेतले जातं.
देशप्रेमी, ग्रंथ प्रेमी,संतप्रेमी व घटनेचे शिल्पकार असणाऱ्या महामानवाची आज १४ एप्रिल रोजी 1३२ वी जयंती आपण साजरी करत आहोत.(जन्म १४ एप्रिल १८९१ )
माझ्या ज्ञानाचा फायदा दीनदुबळ्यांना, दलितांना, समस्त मायभगिनींना व्हावा— असा हट्ट बाबासाहेंबांचा होता.
अमोघ वक्तृत्व आणि कुशल नेतृत्वा सह कायदा, पत्रकारिता, शैक्षणिक, राजकीय अशा अनेकविध क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी देशवासीयांना अंधारातून प्रकाशाकडं जाण्याचा मार्ग दाखवून दिला.
शिक्षणाशिवाय पर्याय नाही.शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे.शिक्षण हे सर्वांसाठी खुलं आहे.हे त्यांनीच त्या वेळी पटवून दिलं.बांडगुळा सारख्या खुशाल जगणा-या समाजाला आणि शिक्षण फक्त आम्हीच घेणार अशा विचारसरणीत वावरणाऱ्या त्या वेळच्या उच्च भ्रु समाजाला ही एक खूप मोठी चपराक होती.
त्यांनी १९४६ साली पिपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली.व मुंबईला
सिध्दार्थ महाविद्यालय सुरू केले.
आज महिला,आणि गरीब दीनदुबळी माणसं शिक्षण घेऊ लागली असून समाज विकासाला गती मिळते आहे.
समाजातील अस्वस्थतेपणा, सुस्तावलेपणा दूर होऊ लागला आहे.तो या शिक्षणामुळेच.
शिक्षणामुळे अंधश्रद्धा, चंगळवाद,विषमता सारखी समाजाला लागलेली किड काही अंशी हद्दपार होत आहे.माणसानं माणसांशी वागायचं कसं? आणि नेमकं आपण जगायचं कसं? याचं शहाणपण शिक्षणामुळेच तर मिळालं.जातीभेदाची किड ही मेंदू पोखरून काढते म्हणून भेदाभेद नष्ट करुन एकसंघ झाल्याशिवाय तळागाळातील प्रश्न मिटणार नाहीत.असा एकात्मिक विचार याच विचारवंतानं दिला.
आणि म्हणूनच वाटतं की डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक अस्मितेचं धगधगतं अग्निकुंड आहे.
हजारो वर्षांचा विषमतेचा पायंडा मोडीत काढणं …खरच हे कोणालाही शक्य नव्हतं त्या वेळी.नक्कीच!!
मंदिराकडं वळणारी पावलं जेव्हा वाचनालयाकडं वळतील तो खरा सुदिन असेल,तो खरा मंगलदिन असेल असा महान आणि क्रांतीकारी विचार शतकांपूर्वी डॉ बाबासाहेबांना सूचला म्हणून आज आपण प्रगतीकडं वाटचाल करु शकलो.नाहीतर वैचारिक मागासलेपणाच्या, भेदाभेदाच्या शृंखला ने आपण करकचून बांधले गेलो असतो आणि सुटकेसाठी धडपडावं लागतं. हे ही त्यावेळी सुचलं नसतं.निमुटपणं सहन करणं एवढंच मग आपल्या हाती होतं.दिशहिन वाटांना आपण फक्त मग कुरवाळत बसलो असतो.
पण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वानं विश्वभर शिक्षणाची ख्याती मिळवली म्हणूनच आपण सर्वसामान्य माणसं
माणसात गणली जाऊ लागलो. ११.४.४७ रोजी च्या हिंदू कोड बिल च्या माध्यमातून स्त्रियांची होणारी पिळवणूक थांबावी,स्त्रियांच्या होणा-या सामाजिक कुंचबणेला कुठंतरी विराम मिळावा.म्हणून कितीतरी कायदे त्यांनी महिलांच्या बाजूनं
मांडले.कुठले होते ते कायदे ?
घटस्फोटाचा अधिकार
प्रसूती पगारी रजा
मालमत्तेचा अधिकार
स्त्री -पुरुष समान काम व समान वेतन अधिकार
महिला कामगार संरक्षण कायदा
(Women lebour protection act)
मतदार अधिकार
महिला आरक्षण.इ.
महिलांचा सामाजिक स्तर आभाळागत उंचावला जावा म्हणून धडपडणारं व्यक्तीत्व म्हणजे डॉ बाबासाहेब होय.
स्त्रीचा एवढा संवेदनशील विचार फक्त एक पिताच करू शकतो खरच!!
सावकारी दगडाखाली ठेचून निघणार्या शेतकरी वर्गासाठीही १७ सप्टें.१९३७ रोजी खोतविरोधी बील विधीमंडळात मांडले.
स्त्रियांना सासर माहेर मध्ये समान वाटा, दलितांना मायभगिनींना शिक्षण, अस्पृश्यता निवारण,स्वातंत्र्य समता, बंधुता ही त्री सुत्री अंमलात आणून लोकशाही आणखी कणखर आणि बलवान बनायला भाग पाडली.
लोकशाहीच्या या महान उपासकाला त्रिवार वंदन केल्याशिवाय मन राहत नाही.
तो देव पुन्हा एकदा मला भेटावा…..
तो देव पून्हा एकदा तूलाही भेटावा…..
असं मनात येऊन ही जातं अनेकदा….
जय शिवराय! जय भिमराय।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस विनम्र अभिवादन
साहित्यिका
✍🏻 अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.
7709464653.