जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, पुणे चॅप्टर (जितो) चा १७ वा वर्धापन दिन संपन्न
नवउद्योजकांना शासनाकडून सर्व सहकार्य-उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे, दि. १२: महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नवउद्योजकांना सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, पुणे चॅप्टर (जितो) च्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आण्णाभाऊ साठे सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेशकुमार संकला, उपाध्यक्ष अशोक हिंगड, सुदर्शन बाफना, विनोद मांडक, मनोज छाजेड, नरेंद्र छाजेड, मुख्य सचिव चेतन भंडारी, कोषाध्यक्ष किशोर ओसवाल, संचालक हितेश शहा आदी उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, जैन समुदायाने उद्योग वाढविण्याबाबत चांगले कार्य केले आहे. दुबईमध्ये जागतिक पातळीवरील उद्योकांचे संमेलन घेण्यात येणार आहे. त्यामध्ये उद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त उद्योजकांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा. राज्यातील उद्योजकांनी परदेशातही उद्योग उभारावेत. उद्योजकांनी सामाजिक दायित्व
निधीचा उपयोग समाज विकासाची कामे करण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जैन समाजातील चार संगठना एकत्र येऊन जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आहे. हा आदर्श बाकीच्या समाजाने घेणे गरजेचे आहे. या संघटनेच्या माध्यमातून खूप चांगले कार्य होत आहे. महात्मा गांधीचे संदेश पुढे घेवून जातांना समाजामध्ये परिवर्तन करण्याचे चांगले कार्य करीत आहेत.
यावेळी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेशकुमार संकला यांनी संघटनेच्या उपक्रमाबददल माहिती दिली.
यावेळी मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यापारी मिलिंद फाडे, उद्योजक प्रकाश पारख, तरुण उद्योजक अजय मेहता, सामाजिक कार्यकर्ते आर. के. लुंकड, महिला उद्योजक सोनल बरमेचा, व्यावसायिक वर्धमान जैन, शिक्षणतज्ज्ञ सुभाष परमार आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.