जागतिक मधमाशी दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे माहितीपर कार्यक्रम संपन्न!
बारामती – अॅग्रीकल्चरल डेव्हलोपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे दिनांक २० मे २०२५ रोजी जागतिक मधमाशी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मधमाशी पालनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. धीरज शिंदे (प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती) यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर श्री. चेतन पाटोळे (प्रकल्प व्यवस्थापक, ICICI फाउंडेशन), श्री. स्वप्निल ढेकळे (डेव्हलपमेंट ऑफिसर, ICICI फाउंडेशन), डॉ. रतन जाधव (विषय विशेषतज्ञ – पशु संवर्धन), कृषी विज्ञान केंद्र, बारामती हे मान्यवर उपस्थित होते.
डॉ. धीरज शिंदे यांनी मधमाशी पालनामुळे कृषि क्षेत्रातील उत्पादनवाढीसोबतच रोजगार निर्मितीचे नवे दालने खुली होतात याकडे लक्ष वेधले. डॉ. मिलिंद जोशी (विषय विशेषतज्ञ – पीक संरक्षण) यांनी मधमाशीच्या जाती, परागीभवनातील योगदान तसेच NDDB आनंद, गुजरात व अॅग्रीकल्चरल डेव्हलोपमेंट ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या मधमाशी उत्पादक शेतकरी कंपनीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी AICRP प्रकल्पाची माहिती देत संशोधनाची व्याप्तीही उलगडून सांगितली.
श्री. संतोष गोडसे (विषय विशेषतज्ञ – कृषि विस्तार) यांनी कृषी विज्ञान केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री. विश्वजीत वाबळे यांनी सेंद्रिय शेतीत मधमाशीचे स्थान स्पष्ट करत सर्वांनी सेंद्रिय शेतीच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
श्री. अल्पेश वाघ (प्रकल्प सहयोगी) व श्री. सचिन शिरसागर यांनी मधमाशी उत्पादनांचे विक्री व्यवस्थापन, हाताळणी आणि नैसर्गिक मध काढणी प्रक्रियेवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मधमाशी तज्ञ श्री. प्रशांत गावडे यांनी मधमाशीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांची माहिती देत जागतिक बाजारपेठेत या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. आशिष भोसले (प्रकल्प सहाय्यक, कृषी विज्ञान केंद्र, बारामती) यांनी केले.
या उपक्रमाला पुणे जिल्ह्यातील तब्बल १३८ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या माध्यमातून मधमाशी पालनाच्या नव्या शक्यतांना चालना देण्यात आली आणि ग्रामीण भागातील शाश्वत शेतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले.


