ग्राहकांना पारदर्शक सेवा मिळण्याकरीता व्यापक स्वरुपात जनजागृती करावी- उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर
बारामती, दि. 26: सद्याचे युग हे सेवा देण्याचे युग असून काळाची आव्हाने ओळखून ग्राहकांना पारदर्शक सेवा मिळण्याकरीता ग्राहक परिषदेने व्यापकस्वरुपात जनजागृती करावी, असे आवाहन उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले. ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरुक राहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
जागतिक ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन प्रशासकीय भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, डाकघर अधीक्षक पी. बी. एरंडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी तितिक्षा बारापात्रे, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संजीव बोराटे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य दिलावर तांबोळी, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.
श्री. नावडकर म्हणाले, बँकेच्या नावाने पाठविण्यात येणारे संदेश, संकेतस्थळावरील फेक लिंक, याद्वारे ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्याअनुषंगाने तक्रार करण्याबाबतही ग्राहक संरक्षण परिषदेने जनजागृती करावी. महसूल विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळत असल्याने नागरिकांच्या वेळेत बचत होत आहे, येत्या काळात कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून नागरिकांना चेहराविहीन (फेसलेस) सुविधा मिळण्यासोबतच विहित वेळेत व त्याही अधिक पारदर्शक पद्धतीने देण्याचा प्रयत्न राहील, असेही श्री. नावडकर म्हणाले.
श्री. झेंडे म्हणाले, यावर्षीचा राष्ट्रीय ग्राहक दिनाचा ‘दूरस्थ पद्धतीने सुनावणी आणि ग्राहकांना न्यायासाठी डिजिटल प्रणालीची सुविधा’ हा मुख्य विषय आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाच्यावतीने ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘जागो ग्राहक जागो ॲप’, ‘जागृती ॲप’ आणि ‘जागृती डॅशबोर्ड’ चा आरंभ केला आहे. या उपयोजकांमुळे (ॲप्लिकेशन्स) ग्राहक व्यवहार विभागाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनैच्छिक बाबी (डार्क पॅटर्न) शोधून काढण्यासाठी साधने आणि संसाधनांसह मदत होणार आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या तरतुदीविषयी श्री. झेंडे यांनी माहिती दिली.
श्री. एरंडे यांनी भारतीय टपाल विभागाच्या आकर्षक योजना, टपाल जीवन विमा तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेबाबत माहिती दिली. श्री. तांबोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री. जाधव यांनी ग्राहकांनी वस्तू व सेवेचा लाभ घेतांना घ्यावयाची काळजी तसेच ग्राहकाचे हक्काचे संरक्षण याबाबत प्रास्ताविकात माहिती दिली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ग.भि. देशपांडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘ग्राहक राजा जागा हो’ तसेच तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘आपली सुरक्षा आपल्या हातात’ या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत (मध्य महाराष्ट्र) सुवर्ण महोत्सवी वर्ष १९७४ ते २०२४ या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी तहसीलदार श्री. शिंदे यांच्या समवेत मान्यवरांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणातील प्रदर्शनास भेटी देत विविध विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवाबाबत माहिती घेतली
0000