ग्रामीण रुग्णालय रुई येथे तालुकास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ३७ हजाराहून अधिक बालकांचे लसीकरण
बारामती, दि. ३: तालुक्यात आज रोजी झालेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ३७ हजाराहून अधिक बालकांचे लसीकरण करण्यात आले.
तालुक्यात आयोजित पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमांतर्गत एकही लाभार्थी पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य विभाग आणि संबंधित पालकांनी घ्यावी, असे आवाहन तालुकास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.
ग्रामीण रुग्णालय रुई येथे आयोजित कार्यक्रमात गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. यास्मिन पटेल, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मृदुला होळकर, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जगताप आदी उपस्थित होते.
डॉ. खोमणे म्हणाले, या महिन्यात ५ ते ७ मार्च या कालावधीत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील आज राहिलेल्या बालकांचे घरोघरी जाऊन वैद्यकीय पथकामार्फत पोलिओचे लसीकरण करण्यात येणार आहे. सर्व पालकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले.
ऊसतोड कामगारांच्या ६७० बालकांना पोलिओचे लसीकरण
बारामती तालुक्यामध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ३८ हजार ६०५ बालके आहेत. त्यापैकी आज रोजी झालेल्या पोलिओ लसीकरण कार्यक्रमात एकूण ३७ हजार ८३२ (९८ टक्के) बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या करीता एकूण ३२९ पोलिओ बुथ व त्यासाठी ८४९ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. १६ फिरती पथके आणि १२ रात्रपाळी पथके, २ ट्रान्झिट पथक तयार करण्यात आले होते. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोड कामगारांच्या ६७० बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात आले.
००००