खासगी एफ.एम. वाहिन्या, कम्युनिटी रेडिओकरीता जाहिरात प्रमाणीकरण आवश्यक–जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर

0
26

खासगी एफ.एम. वाहिन्या, कम्युनिटी रेडिओकरीता जाहिरात प्रमाणीकरण आवश्यक–जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर

पुणे, दि. २४ : निवडणूक प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारी जाहिरात, रेकॉर्डेड संदेश, जिंगल्स, यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणीकरण करुन घेणे आवश्यक आहे. कम्युनिटी रेडिओ आणि खासगी एफएम वाहिन्यांसाठीही या तरतुदी लागू असून जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबींची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले आहे.

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात आयोजित आकाशवाणी, कम्युनिटी रेडिओ व एफएम चॅनेल्सच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

डॉ. ठाकूर म्हणाले, जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असून निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. निवडणूक प्रचाराच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल वाहिन्या, चित्रपटगृहे, रेडिओ, कम्युनिटी रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस संदेश, जिंगल्स, ऑडिओ जाहिराती, तसेच सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घेणे आवश्यक आहे.

विविध माध्यमांवर निवडणूक प्रचाराचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचे सर्व माध्यमातून होत असलेल्या निवडणूक प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पूर्वप्रमाणीकरण न करता जाहिरात प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. आकाशवाणी, कम्युनिटी रेडिओ व एफएम चॅनेल्स यांनी उमेदवार, राजकीय पक्ष तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने अन्य त्रयस्त व्यक्तींकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणीत केल्याची खात्री केल्याशिवाय प्रसारित करू नयेत, असे आवाहनही डॉ. ठाकूर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here