कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पुणे, दि.१५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कॉपीमुक्त परीक्षेसाठी व गैरप्रकारास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यामध्ये भरारी पथके नेमण्यात यावेत, तसेच त्यांना कोणत्याही परीक्षा केंद्रास आकस्मिक भेटी देऊन तपासणी करण्याच्या सूचना द्याव्यात. यासोबत तहसिलदार व गट विकास अधिकारी यांची तालुकास्तर अतिरिक्त भरारी पथके कार्यान्वित करावीत. आवश्यकतेप्रमाणे परीक्षा कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण करावे.
ते पुढे म्हणाले, परीक्षा केंद्रावर आवश्यकतेप्रमाणे पोलीस बंदोबस्त तैनात करावा. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची कसून तपासणी करावी. पोलीस पाटील, कोतवाल, शाळेचे कर्मचारी यांच्याकडून मुलांची तर अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी करावी. परीक्षा केंद्राच्या परिसरात अनाधिकृत व्यक्तींना प्रवेश देऊ नये. परीक्षा केंद्रांचे अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे वर्गीकरण करावे व त्यानुसार अतिरिक्त काळजी घ्यावी.
कॉपीमुक्त परिक्षेसाठी पूर्वतयारी
सन २०२२-२३ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीत तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेकरीता ८८८ शाळेमधील १ लाख ३१ हजार ३१५ विद्यार्थी १९१ परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेकरीता १ हजार ६९४ शाळेमधील १ लाख ३४ हजार ३३० विद्यार्थी २८० परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत. यामध्ये शहरी भागातील २३३ तर ग्रामीण भागातील २३८ अशी एकूण ४७१ परीक्षा केंद्रे आहेत.
यावेळी माहिती देण्यात आली की, परीक्षेचे संचालन सुरळीत होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ठिकाणी वेळेत पोहचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत परिवहन विभागास तसेच परीक्षेच्या कालावधीमध्ये अखंडित विद्युत पुरवठा सुरु ठेवण्याबाबत महावितरण विभागास आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांचे केंद्रसंचालक यांची बैठक घेवून त्यांना परीक्षा कामकाजाबाबत व विहित कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. परीक्षा उपस्थिती, अनुपस्थिती, गैरमार्ग प्रकरणे यांचा अहवाल दररोज ऑनलाईन सादर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळी अवैध मार्गाचा अवलंब करणे कायद्यानुसार अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा आहे.
परीक्षेबाबत गोपनीय कामकाजासाठी जिल्ह्यामध्ये २८ परिरक्षक कक्ष स्थापन करण्यात आले असून त्याठिकाणी २४ तास हत्यारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांची वाहतूक करणारे सहायक परिरक्षक यांचे लाईव्ह लोकेशन परिरक्षकांकडून ट्रॅक करण्यात येईल. लिहिलेल्या उत्तरपत्रिकांवर होलोक्राफ्ट स्टीकर लावलेमुळे विद्यार्थ्यांचे नाव, आसन क्रमांक दिसणार नसून केवळ बारकोडच्या माध्यमातून कामकाज होणार आहे.
परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती
परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त देणे, परीक्षा केंद्रांना भेटी देणे, परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखणे यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दक्षता समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरांचे पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (योजना), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचा समावेश आहे.
समाजातील प्रत्येक घटकानी इयत्ता १२ वी व १० वी ची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.