कृषी विज्ञान केंद्राला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट

0
174

कृषी विज्ञान केंद्राला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट

शेतीमध्ये सर्वाधिक उद्योग निर्मितीची क्षमता- मंत्री सुधीर मुनगंटीवार

बारामती दि. ८ : बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रासह विविध उपक्रमांना वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. सर्वात जास्त उद्योग निर्माण करण्याची क्षमता शेतीमध्ये आहे, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, परीविक्षाधीन-तहसिलदार नेहा शिंदे, उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त रणजित पवार आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.मुनगंटीवार म्हणाले, आजही आपल्याकडे अधिक लोक शेतीवर उपजीविका करत आहेत. कृषि औजारे, उपकरणे नवीन तंत्रज्ञान पाहता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती क्षमता आहे. केव्हीके आणि ट्रस्टमध्ये उपलब्ध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची प्रगती होण्यासाठी नक्कीच चालना मिळेल. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून शेती क्षेत्रात जागतिक स्तरावर होणाऱ्या संशोधनाची माहिती उपलब्ध होत आहे. कृषि विज्ञान केंद्रात नवीन तंत्रज्ञानाचे संशोधन होत आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी चंद्रपूरसह इतर ठिकाणीही येथील कृषि प्रदर्शनासारखी प्रदर्शने आयोजित करण्यात येतील.

इन्क्युबेशन व इनोव्हेशन केंद्राच्या माध्यमातून नवीन संशोधक तयार करण्याचे काम या ठिकाणी होत असल्यामुळे भविष्यात संशोधक तयार होतील आणि नवउद्योग (स्टार्टअप) सुरू करण्यासाठी त्यांना चालना मिळेल असे सांगून त्यांनी ॲग्रीकल्चर ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले.

विविध प्रकल्पांना भेटी

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डेअरी ऑफ एक्सलन्सचा देशी गोवंश सुधार प्रकल्प, अटल इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर, कृषि विज्ञान केंद्रातील भाजीपाला गुणवत्ता केंद्र, ट्रस्टचे उत्पादन प्रकल्प, महिला बचत गटाची उत्पादने, स्टार्टअप इनोव्हेशन व पीएमएफएमइ दालन, फूड प्रोसेसिंग, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, डेअरी टेक्नॉलॉजी, प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग ब्रँडिंग, सायन्स सेंटर आदी ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली.

देशी गोवंश सुधार प्रकल्पामध्ये वैज्ञानिक आणि नाविन्यपूर्ण प्राणी व्यवस्थापन पद्धतींचे प्रात्यक्षिक, मॉडेल हाय-टेक डेअरी फार्म, रोग निदान सेवा व भ्रूण उत्पादन प्रयोगशाळा विषयी सादरीकरण श्री. मुनगंटीवार यांच्यासमोर करण्यात आले.

कृषि विज्ञान केंद्रातील कृषी प्रात्यक्षिक भूखंड, माती आरोग्य युनिट, जैव खते व कीटकनाशके युनिट, सेंटर ऑफ एक्सलन्स हॉर्टिकल्चर युनिट, टिश्यू कल्चर प्रयोगशाळा, हायड्रोपोनिक्स युनिट बाजरी प्रक्रिया इत्यादी उपक्रमाची माहिती त्यांना देण्यात आली.

यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्रा. निलेश नलवडे, माळेगावच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, पोलिस निरीक्षक किरण अवचर, वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, योगेश घोडके आदी उपस्थित होते.

Previous articleजय जय महाराष्ट्र माझा…
Next articleविद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाने काम करावे- राज्यपाल
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here