
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केलेली ऊस शेती पहायची आहे………… भेट द्या कृषीक 2025 ला.
डॉ. योगेश फाटके, श्री तुषार जाधव ( कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती)
बारामतीतील एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रात दिनांक 16 ते 20 जानेवारी दरम्यान होत असलेल्या कृषीक 2025 या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस शेती पाहण्याची संधी मिळणार आहे.

सदर शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी खर्चात ऊस शेती व उत्पादन वाढ हे आहे.
महाराष्ट्र हे देशात ऊस उत्पादनात अग्रेसर राज्य म्हणून ओळखलं जाते.
ऊस शेती हा राज्यातील बहुतेक भागातील शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पादनाचा मार्ग आहे. तरी देखील आजही आपल्या शेतकऱ्यांसमोर ऊस शेती करताना खूपसार्या अडचणी आहेत.
जसं की पाण्याच्या व खताच्या अतिरिक्त वापरामुळे कमी होत चाललेली जमिनीची सुपीकता, दिवसेंदिवस वाढत चाललेला उत्पादन खर्च, कमी उत्पादन व कमी साखर उतारा, लागवडीसाठी योग्य जातीची निवड करताना येणाऱ्या अडचणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव इत्यादी.

आणि म्हणूनच महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकणाऱ्या विषयावर एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट व ॲग्रीपायलट या संस्थांमधील विविध तज्ञांच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस शेती हा प्रकल्प राबविला जात आहे.
सदर प्रकल्प हा महाराष्ट्रातील एकूण 1000 शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर राबविण्याचा विचार असून पुढील टप्प्यात हा आकडा आणखी वाढणार आहे.
आजच्या काळात परदेशातील शेतकरी हे ऊस शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रयोग यशस्वी करताना दिसतात, दुसरीकडे भारतासारख्या विकसनशील देशातील बहुतांश शेतकरीहे आजही पारंपारिक पद्धतीने ही शेती करत आहेत. अशाप्रकारे केली जाणारी शेतीही शेतकऱ्यांसाठी कमी फायदेशीर व निसर्गावर अवलंबून असते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर करून आपण या व अशा प्रकारच्या ऊस शेतीत येणाऱ्या समस्यांवर यशस्वीपणे मात करू शकतो. हाच विचार समोर ठेवून बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने ऑक्सफर्ड विद्यापीठ व मायक्रोसॉफ्ट या जागतिक अग्रगण्य संस्थांबरोबर विशेष संशोधन करून हा प्रकल्प सुरू केला आहे.
या प्रयोगामध्ये मुख्य करून खालील गोष्टीचा समावेश आहे.
- ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान जसे की सॅटलाईट इमेज कम्प्युटर व्हिजन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग व ग्राउंड ट्रुथ इमेजिंग चा वापर करून उत्पादन व साखर उतारा ठरविणे.
- हायपर स्पेक्ट्रल इमेज तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन मिळवणे.
- कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हवामानाचा व पावसाचा सूक्ष्म अभ्यास करून अचूक अंदाज बांधणे.
- ऊस शेतीमध्ये जगामधील पहिल्या कॉजल मशीन लर्निंग चा वापर करून 40% पर्यंत ऊस उत्पादन वाढविणे.
- निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल प्रशिक्षण देणे इत्यादी आहेत.
सदर प्रकल्प अंतर्गत इंटरॅक्टिव्ह व यूजर फ्रेंडली डॅशबोर्ड च्या मदतीने शेतकऱ्यांना हिट मॅप, सेटलाईट इमेजेस, क्रॉपिंग पॅटर्न रिकमंडेशन सिस्टीम, इरिगेशन मॅनेजमेंट, पेस्ट अँड डिसीज मॉनिटरिंग इत्यादी घटकांची माहिती ही स्वतःच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
प्रदेशातील नामवंत संस्थांना बरोबर घेऊन राज्यातील, देशातील व पर्यायाने जगातील ऊस शेतीसाठी फायदेशीर होईल असे तंत्रज्ञान निर्माण करण्याचा उद्देश घेऊन एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट पुढील काळात मार्गक्रमण करणार आहे.
हा प्रकल्प शेतकऱ्यांनाच नाही तर साखर कारखान्यांना देखील खूप फायदेशीर ठरणार आहे.
हे तंत्रज्ञान ऊस शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणू शकते यात तीळमात्र ही शंका नाही.
तरी सदर प्रकल्पाला भेट देऊन त्याची माहिती मिळवण्याकरता भेट द्या कृषिक 2025 ला.