कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाच्यावतीने योग्य मोबदला दिला जाईल-उद्योग मंत्री उदय सामंत

0
114

कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाच्यावतीने योग्य मोबदला दिला जाईल-उद्योग मंत्री उदय सामंत….

बारामती, दि.८: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील ३४७ अंशत: अस्थायी कर्मचाऱ्यांपैकी ३२१ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात आले असून उर्वरित २६ कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याच्यादृष्टीने त्यांना योग्य तो मोबदला देण्यात येईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

हॉटेल सनलँड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कर्मचारी तसेच बारामती औद्योगिक विकास संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल संघटनेच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास  महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता निलेश मोढवे, बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी, अधिकारी-कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरविंद चौधरी, बाळासाहेब जगताप आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने उद्योगवाढीच्यादृष्टीने तसेच कर्मचाऱ्यांना विविध सोई-सुविधा मिळण्याकरीता विविध निर्णय घेण्यात येत आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना परदेशात गुणवतापूर्वक उच्च शिक्षण घेता यावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे निर्णय लागू करण्यात आले. आधुनिक पद्धतीचे शिक्षण घेता यावे यासाठी या यावर्षी ३९७ टॅब देण्यात येणार आहे.

आपल्या सर्वांच्या योगदानामुळे महाराष्ट्र गुंतवणुकीत
देशात प्रथम क्रमांकाचे राज्य म्हणून ओळखले जाते. कर्मचारी हा उद्योग संस्था कणा असून तो प्रामाणिकपणे काम करुन राज्याला प्रगती पथावर नेण्याचे काम करीत असतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, त्यांना विश्वासात घेऊन काम करावे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कर्मचाऱ्यांनी यापुढेही असेच प्रामाणिकपणे काम करीत राहावे, असे आवाहन श्री. सामंत यांनी केले.

शासन उद्योजकाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे. स्थानिक उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून गुंतवणूक वाढीसोबतच रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. औद्योगिक वसाहती मधील पायाभूत सुविधा चांगल्या असल्यास अधिकाधिक उद्योजक आकर्षित होऊन उद्योगधंद्यात गुंतवणूक करतात. त्यामुळे वसाहती सुदंर व स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा.

बारामती औद्योगिक विकास संघटनेच्या विविध मागण्यावर सकारात्मक निर्णय घेऊन कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बारामतीचे नाव अधिक उज्ज्वल करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, असे आवाहन श्री. सामंत यांनी केले.

यावेळी श्री. जगताप यांनी विचार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here