औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी सुवर्णसंधी – शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ४० लाखांचा निधी उपलब्ध!
पुणे, दि. २०: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यं गवात आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे! केंद्र शासनाच्या ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ अंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी ‘औषधी वनस्पती लागवड’ हा नवीन घटक समाविष्ट करण्यात आला असून, या योजनेंतर्गत लाभ घ्यावा असे आवाहन https://mahadbtmahait.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यात आले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी केंद्र शासनाने तब्बल ४ कोटी ४० लाख रुपये इतका वार्षिक कृती आराखडा मंजूर केला आहे. या योजनेंतर्गत अनेक औषधी वनस्पतींसाठी प्रतिहेक्टर आर्थिक मदत मिळणार आहे.
या औषधी वनस्पतींमध्ये समाविष्ट वनस्पती व अनुदानाचे तपशील पुढीलप्रमाणे –
१ लाख ५० हजार रुपये/हेक्टर: ज्येष्ठमध, शतावरी, कालीहारी, सफेद मुसळी, गुग्गुळ, मंजिष्ठा, कुटकी, अतिस, जटामासी, अश्वगंधा, ब्राम्ही, तुलसी, विदारीकंद, पिंपळी, चिराटा, पुष्करमूळ.
१ लाख २५ हजार रुपये/हेक्टर: गुलाब, रोझमेरी, निशिगंध, जिरेनियम, कॅमोमाईल, चंदन, दवणा, जाई, लॅव्हेंडर यांसारख्या महाग सुगंधी वनस्पती.
५० हजार रुपये/हेक्टर: इतर सर्वसामान्य सुगंधी वनस्पती.
सहाय्याची टक्केवारी:
सर्वसाधारण क्षेत्र: ४०%
अधिसूचित क्षेत्र: ५०% (अर्थात, अधिकतम २ हेक्टरच्या मर्यादेत अनुदान उपलब्ध.)
शेतकऱ्यांनो, ही एक सुवर्णसंधी आहे! बदलत्या हवामानात टिकणारी आणि व्यापारीदृष्ट्या फायदेशीर अशी औषधी वनस्पती लागवड केवळ उत्पन्नाचाच नव्हे, तर आरोग्य संवर्धनाचाही मार्ग खुला करते. अर्ज करण्यासाठी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या आणि आपले भवितव्य सुदृढ करा!
– कृषी विभाग, जिल्हा प्रशासन, पुणे

