ऑटो रिक्षा चालकांसाठी बारामती RTO कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम
बारामती (प्रतिनिधी) –
बारामती ऑटो रिक्षा महासंघाच्या वतीने नुकतेच शहरातील 25 ऑटो रिक्षांचे ग्रुप पासिंग करण्यात आले. त्यानंतर सोमवारी (ता. 25) बारामती प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सुरेंद्र निकम यांच्या हस्ते या 25 रिक्षा चालकांना योग्यता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी सहकारी मोटार वाहन निरीक्षक श्री. चंद्रमोहन साळोखे, वैभव जाधव, सहायक मोटार वाहन निरीक्षक संजय भापकर, सागर ठेंगील, मोहन भापकर, बारामती शहर व तालुका ऑटो रिक्षा महासंघाचे अध्यक्ष श्री. प्रशांत (नाना) सातव, पदाधिकारी किशोर कांबळे, अशोक कांबळे, दादा शिंदे, तसेच बारामती टिपर वाहतूक संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन मोहिते, उपाध्यक्ष किरण देशमुख, सचिव बाळराजे कुंभार, बारामती मोटार वाहन संघटनेचे प्रतिनिधी श्री. शाकीर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. निकम म्हणाले, “शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढताना दिसते. सर्व रिक्षाचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे, प्रवाशांबरोबर सोजन्याने वागणे आणि वाहनांचे सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवणे आवश्यक आहे.”
तसेच, एकाच वेळी 25 रिक्षांचे ग्रुप पासिंग करून रिक्षा चालकांनी दाखविलेल्या शिस्तीचे व उपक्रमाचे श्री. निकम यांनी कौतुक केले. भविष्यातही अशा पद्धतीने ग्रुप पासिंग करण्यास RTO कार्यालयाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महासंघाचे अध्यक्ष प्रशांत (नाना) सातव यांनी शहरातील रिक्षांसाठी निश्चित थांबा नसल्याने चालकांना होत असलेल्या अडचणींकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले व लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली.

रिक्षाचालकांना केवळ शासकीय फी स्वीकारून ऑनलाईन कागदपत्रे करण्यास मदत करणाऱ्या श्री. कौशल गांधी यांचा श्री. निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. भीमराव मोरे, सचिव – बारामती-दौंड-इंदापूर रिक्षा कृती समिती, तसेच किशोर कांबळे, अशोक कांबळे, दादा शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
