ऊस पाचट कुचविण्याची प्रक्रिया करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
बारामती, दि. 2: शेतकऱ्यांना ऊसाच्या पाचटाचे महत्व पटवून देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने मागील २ वर्षापासून ‘ऊस खोडवा उत्पादन व पाचट व्यवस्थापन अभियान’ राबविण्यात येत आहे, ऊसाचे पाचट कट्टी करून कुजविल्यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाचट न जाळता त्यावर कुजविण्याची प्रक्रिया करण्याची करावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी यांनी केले आहे.
बारामती कृषी उपविभागात बारामती, दौड, इंदापूर व पुरंदर या ४ तालुक्यात ऊसाचे हंगामनिहाय क्षेत्र आडसाली ३८ हजार ७९७ हेक्टर, पुर्वहंगामी ११ हजार ७६८ हेक्टर, सुरू १० हजार ८७५ हेक्टर व खोडवा २३ हजार ८३८ हेक्टर असे एकूण ८३ हजार २७६ हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे.
ऊस तुटल्यानंतर शिल्लक राहिलेले ऊसाचे बुडके कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत. तुटलेल्या बुडख्यांवर ०.१ टक्के बाविस्टीनची फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगाचा प्रतिबंध होतो. शेतात प्रति एकर अंदाजे ४ टन पाचट असते. या प्रति एकर पाचटासाठी ४५ किलो युरिया, ५० किलो सुपर फॉस्फेट समप्रमाणात पाचटावर टाकावे व नंतर ५ किलो पाचट कुजविणारे जिवाणू २ टन सेंद्रीय खतात (मळी, कंपोस्ट) समप्रमाणात टाकावे. त्यानंतर पहिले पाणी दयावे. ऊस तुटून गेल्यानंतर पहिल्या १५ दिवसांमध्ये याप्रमाणे पाचट कुजविण्याची प्रक्रिया करावी, असेही श्री. चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.