उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शिवाजीनगर बसस्थानकाच्या कामांचा आढावा
पुणे दि.२०-उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत शिवाजीनगर बसस्थानक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील उड्डाणपूल कामांचा आढावा घेतला.
बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बप्पा बहिर आदी उपस्थित होते.
महामेट्रोने त्यांच्या खर्चातून करावयाची कामे त्वरित सुरू करावी. उर्वरित इमारतीच्या कामासाठी राज्य शासनातर्फे निधी देण्यात येईल. राज्य परिवहन महामंडळाने इमारतीतील त्यांना आवश्यक जागेची माहिती द्यावी, इतर जागेत शासकीय कार्यालयासाठी जागा देण्याबाबत प्रशासनाने माहिती घ्यावी, असे श्री.पवार यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याबाबत विचार व्हावा. ब्रेमेन चौकातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे पुणे महानगरपालिकेने तातडीने करावे. कृषी महाविद्यालय ते सिंचन नगर मैदानाकडून जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आणि कारची वाहतूक वळविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बसस्थानक कामाचा आराखडा प्राप्त झाला असून पुढील अडीच वर्षात शिवाजीनगर येथील बसस्थानाकाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे श्री.हर्डीकर यांनी सांगितले.
यशदाला देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था करा
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यशदाच्या मास्टर प्लॅनचा आढावा घेतला. यशदाला भारतातील सर्वोत्तम संस्था करण्यासाठी आराखडा तयार करावा, त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. आदर्श आराखड्यासाठी स्पर्धा घेण्यात यावी आणि त्यातून उत्तम कल्पनांचा समावेश अंतिम आराखड्यात करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीला यशदाचे अतिरिक्त महासंचालक सचिंद्र प्रताप सिंह आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांसमोर सहकार भवनचेही सादरीकरण करण्यात आले. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे उपस्थित होते. आराखड्यात सभागृहाची क्षमता वाढविण्याबाबत विचार करावा, साखर संकुल आणि पणन विभागाची गरजही लक्षात घ्यावी,अशी सूचना श्री.पवार यांनी केली.