दि. 30 एप्रिल 2025.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्रदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची राज्यातील उपस्थिती आणि
विकासकामांचे उद्घाटन ही महाराष्ट्रवासियांसाठी आनंदाची बाब
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्राची प्रगतीच्या वाटेवरची घोडदौड कायम राखतानाच,
‘सुसंस्कृत राज्य’ ही ओळख कायम ठेवण्याचा निश्चय करुया
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
केंद्र सरकारचं सहकार्य व महाराष्ट्रवासीयांच्या एकजूटीच्या
बळावर राज्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा दृढनिर्धार करुया
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 30 :- “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा 65 वा वर्धापनदिन साजरा करीत असताना, राजधानी मुंबई देशाचं ‘ग्रोथइंजिन’ तर, महाराष्ट्र सर्वात प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारांचं राज्य असल्याचा समस्त महाराष्ट्रवासियांना, महाराष्ट्रप्रेमींना आनंद आहे. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार अशा सर्व क्षेत्रातली महाराष्ट्राची घोडदौड कायम राखताना ‘सुसंस्कृत राज्य’ ही महाराष्ट्राची ओळख कायम ठेवण्याचा दृढनिश्चय करुया,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापनादिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी त्याग केलेल्या, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या, महाराष्ट्रवीरांना अभिवादन केले आहे. महाराष्ट्रवीरांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात पुढे म्हणाले की, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी रस्ते, रेल्वे, धरणं, रुग्णालये, शाळा-महाविद्यालये आदी पायाभूत सुविधांची निर्मिती करतानाच, महाराष्ट्राला कला, साहित्य, क्रीडा, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्यावर भर दिला होता. त्यांच्यानंतरच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय चव्हाण साहेबांचे विचार, कार्य पुढे नेण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केला. नागरिकांनीही त्यांच्या प्रयत्नांना एकजुटीने साथ दिली. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजूट होण्याची ही परंपरा कायम ठेवूया, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
यावर्षीच्या महाराष्ट्रदिनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रात येत असून त्यांच्या हस्ते ‘वेव्हज परिषदेचं’ तसंच इतरही विकासकामांचं उद्घाटन होत आहे, याचा महाराष्ट्रवासीयांना मनापासून आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे महाराष्ट्राला विकासकामांसाठी मिळणारे सहकार्य आणि सर्व महाराष्ट्रवासीयांची एकजूट, या बळावर आपण महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेण्यासाठी दृढसंकल्प होऊया, असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
