उद्योजकांशी समन्वय वाढवून लोकाभिमुख कामकाज करणार- प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील

0
31

उद्योजकांशी समन्वय वाढवून लोकाभिमुख कामकाज करणार- प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील

बारामती दौंड इंदापूर व पुरंदर तालुक्यातील एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व भूखंड धारकांच्या सोयीसाठी महामंडळाने नव्यानेच स्वतंत्र बारामती प्रादेशिक कार्यालयाची निर्मिती केली आहे. या परिसरातील उद्योजकांचे प्रश्न जाणून त्यांच्याशी अधिक समन्वय वाढवून लोकाभिमुख कामकाज करू अशी ग्वाही नवनियुक्त प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिली. एमआयडीसीच्या बारामती प्रादेशिक कार्यालयाचा प्रादेशिक अधिकारी (Regional Officer )म्हणून हनुमंत पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार, एम आय डी सी चे कार्यकारी अभियंता विजय पेटकर , रियल डेअरीचे चेअरमन मनोज तुपे, बिडा असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबीरशाह शेख वकील, सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, खंडोजी गायकवाड, हरिश्चंद्र खाडे, राजन नायर, अभिजीत शिंदे, उद्योजक विकास शेळके, विकास गायकवाड, सुधीर सूर्यवंशी, नितीन तुपे, संदेश मोदी आदी मान्यवरांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन संवाद साधला.

धनंजय जामदार म्हणाले बारामती मध्ये एमआयडीसीचे नवीन स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय मंजूर करावे यासाठी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, त्यामध्ये एमआयडीसीचे बारामतीला स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय स्थापन करावे असा निर्णय झाला व आता सदर कार्यालय कार्यान्वित होत आहे. या कार्यालयामुळे उद्योजकांचे पुण्याचे हेलपाटे थांबणार असून आर्थिक पिळवणूक व मानसिक त्रास बंद होणार आहेत असे अध्यक्ष धनंजय जामदार म्हणाले.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बारामतीसाठी नवीन स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय मंजूर केल्याबद्दल व उद्योजकांची एक मोठी गैरसोय कायमची दूर केल्याबद्दल बारामती परिसरातील उद्योजक समाधान व्यक्त करून दादांना धन्यवाद देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here