
उद्योगव्यवसायिकांना अर्थसाक्षर करण्यासाठी प्रयत्न करणार – सुशिलकुमार सोमाणी
बारामती एमआयडीसी व परिसरातील उद्योजक निरंतर कष्ट करून व कल्पकतेने उद्योग व्यवसाय करून चांगले अर्थार्जन करत आहेत परंतु योग्य माहिती अभावी आर्थिक नियोजन त्यांना करता येत नाही. अशा उद्योजकांना कायदेशीर तरतुदींचा पुरेपूर वापर करून अधिक प्रभावी आर्थिक नियोजन करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन बारामतीतील सुप्रसिद्ध उद्योग व्यावसायिक सुशीलकुमार सोमाणी यांनी दिले. कॉसमॉस बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य म्हणून सुशीलकुमार सोमाणी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्ताने बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य मनोज पोतेकर व हरिश्चंद्र खाडे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले त्यावेळी सोमाणी बोलत होते.
धनंजय जामदार म्हणाले आर्थिक शिस्त व नियोजन नसलेने अनेक उद्योजक अवाजवी कर भरत आहेत तसेच त्यांनी अयोग्य ठिकाणी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीमुळे ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे उद्योजकांना अर्थसाक्षर करण्यासाठी सुशीलकुमार सोमाणी यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा धनंजय जामदार यांनी व्यक्त केली.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून आपण उद्योजकांना आर्थिक शिस्त व नियोजनाचे मार्गदर्शन करणार असल्याची ग्वाही सुशीलकुमार सोमाणी यांनी बिडा च्या पदाधिकाऱ्यांना यावेळी दिली.