आयसीसी’ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

0
21

दि. 9 मार्च 2025

‘आयसीसी’ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

भारतीय संघाचा लौकिकास साजेसा विजय;
प्रत्येक भारतीयास क्रिकेट संघाचा अभिमान
-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 9:- भारतीय क्रिकेट संघाने आपल्या अप्रतिम खेळाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले असून, संपूर्ण देशभरात या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवत भारताने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयाच्या ऐतिहासिक क्षणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, “भारतीय संघाने दाखवलेली जिद्द, समन्वय, संघभावना आणि सर्वोच्च दर्जाचा खेळ प्रत्येक भारतीयाच्या मनाला आनंद देणारा आहे. अंतिम सामन्यात खेळाडूंनी दाखवलेली चपळता, आत्मविश्वास आणि शेवटच्या क्षणापर्यंत दिलेली झुंज ही भारतीय क्रिकेटच्या लौकिकास साजेशी होती. संपूर्ण संघ, प्रशिक्षक मंडळ व सहयोगी सदस्यांचे तसेच खेळाडूंचा उत्साह वाढविणाऱ्या समस्त क्रिकेट रसिकांचे यासाठी विशेष अभिनंदन. हा विजय तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असून, भविष्यात भारतीय क्रिकेट विक्रमांचे आणि लोकप्रियतेचे नवे उच्चांक प्रस्थापित करेल, असा विश्वास आहे. भारतीय संघाने उंचावलेला हा विजयाचा झेंडा भविष्यातही असाच फडकत राहो, यासाठी संपूर्ण देश त्यांच्या पाठिशी आहे. संघाच्या या नेत्रदीपक विजयाने संपूर्ण देशाला अभिमान वाटतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here