आनंदी व्हा आणि आनंद वाटा…
छोटी-छोटी खुशियाँ ही तो
जीने का सहारा बनती हैं,
ख्वाहिशों का क्या?
वो तो पल-पल बदलती हैं।
लॉयन्स क्लब ही विश्वव्यापी सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. श्रीमंत, प्रतिष्ठीत व्यक्ती या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवितात. गरजुंना मदत करतात तर यातून समाधान मिळवितात. या संस्थेत लॉयन्स हा पुरुषांचा तर लॉयनेस हा महिलांचा क्लब असे दोन भाग होते. तसे सरासरी प्रत्येक क्लबमध्ये असतात. रोटरी क्लबमध्ये इनरव्हिल क्लब हा महिलांसाठीचा क्लब आहे. परंतु जागतिक पातळीवर पुरुष-महिला असा भेद न ठेवता फक्त लॉयन्स क्लब हा एकच क्लब ठेऊन स्त्री-पुरुष असे दोघे सभासद राहतील, असे केल्याने भारतातील लॉयनेस या महिला क्लबचे अस्तित्व संपविण्यात आले. परंतु भारतीय महिलांची स्वतंत्रपणे कार्य करण्याची मानसिकता पाहून लॉयनेस ऐवजी ‘लिनेस’ क्लब (लॉयन्सशी संबंध नाही असा) हा अस्तित्वात आला. ऑल इंडिया लिनेस क्लब मल्टीपल चर्तुभूजा २०२३ च्या पदाधिकार्यांचा शपथविधी कार्यक्रम नुकताच खामगाव येथे झाला. अध्यक्षा सौ.निर्मलाजी सुरेंद्र जैन यांनी या वर्षीची थीम ‘स्प्रेड हॅपीनेस,’ (आनंद वाटा) अशी जाहीर केल्याने या विषयावर लक्ष वेधल्या गेले.
प्रत्यक्षात ‘आनंद’ ही एक अनुभूती आहे. त्यासाठी दुसर्या व्यक्तिवर, वस्तूंवर, वैभवावर विसंबून राहू नये. आनंद ही स्वत:ची निर्मिती आहे. याला निर्माण करण्याची आपल्यातच शक्ती आहे. मात्र त्यासाठी भूतकाळ विसरावा लागतो. भविष्याची चिंता टाळावी लागते. आणि वर्तमानात जगावे लागते. मुळात माझ्या मनासारखे झाले किंवा मला पाहिजे ती वस्तू मिळाली तर आनंद होईल. ही संकल्पना कायमस्वरुपी आनंद देणारी नाही. या संकल्पनेत जे पाहिजे ‘तेवढे’ झाले की निर्माण झालेला आनंद संपतो आणि परत आपण आनंदांच्या शोधात लागतो. आणि हे चक्र थांबत नाही. तशी तर सर्वच वेळ, वर्तमानात जगून आनंदी राहण्याची असते. आणि नेहमी आनंदी राहताही येते. त्यासाठी मात्र प्रयत्नपूर्वक काही सवयी लावून घ्यायच्या असतात.
‘आनंद’ विषयावर अभ्यासकांनी खूप काही लिहिले आहे. तर काहींनी धार्मिक आनंद, सामाजिक आनंद, आसुरी व अघोरी आनंद, भौतिक आनंद, असे आनंदाचे प्रकारही ठरविले आहेत. मात्र हे सर्व आनंद क्षणीक ठरतात. तर नेहमी आनंदी राहणारे लोकच आनंद वाटू शकतात. वातावरण आनंदी ठेऊ शकतात आणि आनंद पसरवू शकतात.
आनंदी राहणार्या व्यक्तिंचे काही वैशिष्ट्ये आहेत. आनंदी व्यक्ती नेहमी चांगलं शोधतात, वाईटकडे दुर्लक्ष करतात . आपल्या मनाप्रमाणे झाले नाही तर ईश्वराच्या मनाप्रमाणे झाले, असे मानून म्हणून ते वाईट नसणारच, असा हा विचार असतो. तसेच
आनंदी राहणारे व्यक्ती क्षमा करणारे व क्षमा मागणारे असतात. लहान-मोठ्या गोष्टी मनाला लावून घेत नाहीत. त्यांना दुसर्यांसोबतच स्वत: ला ही माफ करतात येते. ते आपल्या सभोवताली सशक्त पाठबळ बनवून असतात. हे पाठबळ मित्र, नातेवाईक व कुटुंबियाकडून होते. कारण कितीही पैसा, पद व प्रतिष्ठा असो, एफ अॅन्ड एफ अर्थात फॅमिली अॅन्ड फ्रेन्ड्स शिवाय जास्तवेळ आनंदी राहता येत नाही, हे ते समजून असतात. आनंदी राहणारे व्यक्ती मनाप्रमाणे काम निवडतात व करतात किंवा जे काम करतात त्यात मन लावतात. आपल्याच कामाबद्दल व संस्थेबद्दल नेहमी वाईट बोलून अडचणी वाढवून घेत नाहीत. वैज्ञानिकांच्या मते प्रत्येकाचे डोक्यात दररोज ६० ते ६५ हजार विचार २४ तासात येतात. त्यात जास्त नकारात्मक विचार असतात. त्यातील बहुतांश विचार नंतर आठवतही नाहीत परंतु जे आठवतात त्यातील फक्त सकारात्मक विचारांचाच विचार आनंदी व्यक्ती करतात.
विशेष म्हणजे आनंदी राहणारे लोक आपल्या आयुष्याला किंवा कामाला मोठ्या उद्देशाने जोडतात. बांधकाम करताना विटा वाहून नेतो, पोटापाण्यासाठी करतो या विचारापेक्षा भव्य मंदिर, समाजोपयोगी वास्तू बांधत आहे, सामाजिक कार्य करीत आहे, असा विचार करणे, म्हणजे मोठ्या उद्देशाने स्वत:ला जोडणे, असे होय. तसेच आनंदी राहणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात घडणार्या गोष्टींसाठी स्वत:ला जबाबदार मानतात. ते जबाबदारी घेतात, त्यातून शिकतात. दुसर्यांना दोष देऊन मोकळे होत नाहीत. ‘ट्राफीक जाम’ असेल तर थोडे लवकर निघायला हवे होते, असा हा विचार असतो. वास्तविक आयुष्यात प्रत्येक व्यक्ती उपरोक्त पैकी काही गोष्टी कधीकधी पाळतो. सवय लावून घेत, नेहमी पालन केले. तरच आयुष्य मात्र आनंदी करता येतं आणि नंतरच आनंद वाटता येतं. एवढे मात्र खरे।
शेवटी आनंदी राहण्याचा संकल्प करतांना अनेक वेळा बोलण्या- बोलण्यातही आपण आनंद गमवितो तेव्हा काळजीपूर्वक बोलावे. या आशयाचा एक शेर आठवतो…
शब्दों के इत्तेफाक मे
युँ बदलाव कर के देख,
तू देखकर न मुस्कुरा,
बस मुस्कुरा के देख