ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं – संत सेना महाराज
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥
ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जिवलग निरधरि ज्ञानदेव ॥३॥
सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान । दाविली निजखूण ज्ञानदेव ॥४॥
आज ….संत श्री सेनामहाराज पुण्यतिथी
श्रावण कृ. १२
कोणताही व्यवसाय प्रतिष्ठित वा अप्रतिष्ठित नसतो तर तो व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या मनाच्या उंचीवर व
स्वीकृत कार्य कर्तव्यनिष्ठेने व प्रामाणिकपणे करण्याच्या वृत्तीवर अवलंबून असतो, याचा आदर्श प्रत्यक्ष आपल्या
जीवनाद्वारे इतरांना घालून देणारे संत सेना महाराज यांचा जन्म बांधवगड येथे वैशाख वद्य द्वादशी, रविवार; विक्रम संवत १३५७ या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवीदास तर आईचे नाव होते प्रेमकुंवरबाई. चौकस व चौफेर बुद्धीच्या सेनाच्या मनात बालवयातच ईश्वरप्रेम निर्माण होऊन भजन, प्रवचन, वाचन यातून ज्ञानसाधना घडत गेली. गुरू रामानंदांनी त्याचा पारमार्थिक अभ्यास पाहून रामनामाचा मंत्र दिला. शिवाय रामभक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी सोपविली. वडील निवर्तल्यानंतर परंपरेनुसार राजसेवेचे काम
मोठेपणी सेना न्हावी यांच्याकडे आले.
राजा वीरसिंह व सेनाजी लहानपणापासून एकत्र वाढल्यामुळे त्यांच्यात जिव्हाळा होता. सेनार्जीच्या ज्ञानाने व सात्त्चिक वृत्तीने राजा वीरसिंह प्रभावित झाला होता. राजाची दाढी करून अंगाला मर्दन केल्यावर स्नान घालणं या राजसेवेसाठी; आपली दिनचर्या आटोपून देवपूजा, भजन केल्यानंतर धोकटी घेऊन सेनाजी दरबारात अगदी वेळेवर हजर राहात. आपला व्यवसाय करताना त्यांनी आपपरभाव किंवा स्पृश्यास्पृश्य भाव मनाला कधी शिवून
दिला नाही. सर्वांची सेवा समभावाने ते करीत.
व्यवसाय व प्रपंच सांभाळून नामस्मरण व भक्ती करणे हीच त्यांची जीवननिष्ठा बनली होती. सर्व भूतमात्रात ते परमेश्वराचा अंश पाहू लागले. लोकांना प्रसन्न ठेवणे म्हणजे ईश्वरालाच प्रसन्न ठेवणे होय अशी त्यांची श्रद्धा होती. परमेश्वराच्या आर्त व अखंड भक्तीमुळे परमात्मभेटीचा आनंद त्यांना प्राप्त झाला. न्हाव्याचा शूद्र समजला जाणारा व्यवसाय परमार्थरूप करून टाकण्यात सेनाजींनी यश मिळविले. त्यांनी बरेच अभंग रचले.
“आम्ही वारीक बारीक । करू हजामत बारीक ॥
विवेक दर्पण आयना दावू । वैराग्य चिमटा हालवू ॥”
अशा प्रकारे माणसांना ‘विवेकाचा आरसा’ दाखवून डोक्यातील ‘विषयाचे तण’ ‘वैराग्याच्या’ कात्रीने उडविण्याचे कार्य त्यांनी केले.
एकदा सेनाजींच्या घरी साधुसंत आले होते. त्यांचे आदरातिथ्य व सेवा यात गुंगून गेल्यामुळे सेनाजी वीरसिंहाकडे वेळेवर जाऊ शकले नाहीत. त्यात दुष्ट सेवकांनी सेनाजीबद्दल राजाचे वाईट मत करून दिले. त्यामुळे ‘सेनाजींना असेल तसे पकडून शिरच्छेद करा’ अशी राजाज्ञा झाली तेव्हा संकटकाळी भक्तांना सांभाळणाऱ्या परमेश्वराने सेनाजींचे रूप घेऊन वीरसिंहाची सर्व सेवा केली. हे कळल्यानंतर सेनाजींसह परमेश्वरदर्शन झालेले वीरसिंहजीही धन्य झाले. असे हे संत सेनाजी, महाराष्ट्राबाहेर जन्मले पण घडले महाराष्ट्रीय संत सहवासात ! कर्तव्यबुद्धीने ईश्वरार्पण केलेली सारीच कर्मे शुद्ध असतात असे सांगणारे सेनाजी श्रावण वद्य द्वादशीस अनंतात विलीन झाले. त्यांनी आपल्या अभंगात सांगून ठेवले आहे
“असाल करा तेथे नामाचे चिंतन ।
याहुनि साधन आणिक नाही ॥”
भावनगरी च्या वतीने श्री संत सेना महाराज यांच्या प्रति ….. शतशा: कोटी कोटी नमन…