चित्र कालचं अंतस्थ गर्भातलं
खोल खोल दडलेलं
पोटाच्या वरच्या त्वचेपासून
गर्भाशयापर्यंतच्या कितीतरी अस्तरांना फाडत
अलगद काढलं गेलं बाळाला
सिझेरियन इज सक्सेसफुल
शुद्धीवर आल्यानंतर
कुरवाळलं बाळाला
अन् मग पाहिलं तिनं..
समोर बसलेल्या आईला
डबडबल्या डोळ्यानं आई म्हणाली,
बाय! लहानपणी बोट कापलं तर गावभर धुमाकूळ घालणारी तू
रडून रडून घर डोक्यावर घेणारी तू ..
जखमांवर फुंकर घाल म्हणून थयथय नाचणारी तू..
आज
हातभर फाडून घेतलंस नं स्वतःला..
बोटावर आणि पोटावर हळुवार फुंकर घालत
आई पुटपुटत राहिली
‘आई व्हायला वेदनेतूनच जावं लागतं बाईला’..!
©️🖋️ अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.
७७०९४६४६५३
✍️ अंजली राठोड श्रीवास्तव, करमाळा
