अनेकान्त स्कूलमध्ये महावीर जन्म कल्याणक उत्साहात साजरा
बारामती, दि. ९ एप्रिल – अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भगवान महावीर जन्म कल्याणक उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध विचारवंत डॉ. सुधीर शास्त्री उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी एकसुरात नवकार मंत्राचे पठण करून वातावरण भक्तिमय केले. विद्यार्थ्यांनी महावीर स्वामींच्या नामाचा गौरव करणारे सुमधुर भजन सादर केले.
कार्यक्रमात महावीर स्वामींच्या जीवनावर आधारित माहितीपूर्ण व्हिडीओ दाखवण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांना त्यांचा जीवनप्रवास समजून घेता आला.
आपल्या भाषणात डॉ. शास्त्री यांनी भगवान महावीर यांचे अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही तत्त्वे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. तसेच या तत्त्वांचा अंगीकार करून जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संयोजन शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाने केले. उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेतला.
