बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड येथे रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचे मान्यतेने रेशीम कोष खरेदी विक्री खुली बाजारपेठ केंद्र सुरू आहे. रेशीम कोष मार्केट मध्ये ई-नाम द्वारे ऑनलाईन पद्धतीने लिलाव होत असल्याने योग्य दर, अचुक वजन व वेळेत व खात्रीशीर पेमेंट मिळत असल्याने रेशीम कोष मार्केट मध्ये पारदर्शक व्यवहार होत आहेत. त्यामुळे शेतक-यांची विश्वासहर्तता वाढत चालली आहे. शेतक-यांना वेळेत ऑनलाईन पेमेंट मिळत असल्याने परिसरातील व आसपासच्या जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी बारामती मार्केट मध्ये कोष विक्रीस आणत आहेत. परंतु खुली बाजारपेठ विक्री व्यवस्था असताना ही काही खरेदीदार परस्पर अनधिकृतपणे शेतक-यांकडुन परस्पर दर ठरवुन कोष खरेदी करीत आहेत असे निर्दर्शनात आले आहे. सदरची बाब ही समितीचे कायद्याचे दुष्टीने बेकायदेशीर आहे. तसेच परस्पर खरेदी व्यवहारा मध्ये योग्य दर देत नसल्याचे व वजनात कपाती, कडती अशा गोष्टी घडत असल्याच्या तक्रारी समितीकडे आल्या/ येत आहेत. कोषास योग्य दर व अचुक वजन न देणे तसेच वेळेत पेमेंट न करणे इत्यादी मार्गाने व परस्पर खरेदी मुळे शेतक-यांची फसवणुक होत असल्याचे समितीचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतक-यांनी आपला कोष बाहेरील खरेदीदारास देऊ नये. आपला कोष बारामती मार्केट मध्येच विक्रीस आणावा.
रेशीम कोष हा शेतमाल शासनाने नियमनात आणला असल्याने याचा समाविष्ठ बाजार समितीचे नियमनात येत आहे. महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ कलम ३२ अ अन्वये लायसन्स धारक व अनधिकृत खरेदीदार यांनी परस्पर माल खरेदी करू नये, विना परवाना व परस्पर माल खरेदी करणे बेकायदेशीर आहे. असा प्रकार आढळुन आल्यास सदरचा कोष वाहनासह जप्त करणेत येईल व पुढील कायदेशीर कारवाई करणेत येईल. कृपया याची संबंधितांनी नोंद घ्यावी. ज्यांना रेशीम कोष खरेदी करावयाचे आहेत. त्यांनी परवाना घेणेसाठी बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यासाठी रू. ५०००/- लायनेन्स फी डिपॉझिट, अर्ज, साधार कागदपत्र घेऊन लायसेन्स देणेत येईल. तरी रेशीम कोष उत्पादक शेतक-यांनी आपली फसवणूक टाळणेसाठी आपला माल बारामतीचे रेशीम कोष मार्केट मध्ये विक्रीस आणावा असे आवाहन बारामती बाजार समितीचे सभापती सुनिल पवार, उपसभापती निलेश लडकत व सचिव अरविंद जगताप यांचे तर्फे करणेत येत आहे.